सांगलीतील व्यक्तीच्या ‘पॅन’ वर दिल्लीत घोटाळा
(crime news) येथील एका व्यक्तीच्या पॅन नंबरचा वापर करत दिल्लीत 18 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचे दाखवून एका व्यक्तीने 3.50 कोटी रुपयांचा जीएसटी चुकवला आहे. जीएसटी विभागाकडून कोट्यवधी रुपयांचे घोटाळे उघडकीस आणले जात असताना घोटाळेबाजही नवनवे फंडे वापरत घोटाळे करत असल्याचे दिसत आहे.
आर्थिक वर्षअखेर संपत असताना सांगलीतील एका व्यक्तीस आयकर विभागाकडून नोटीस आली. ही व्यक्ती केंद्र शासनाचा कर्मचारी आहे. या व्यक्तीने दिल्ली येथे सप्टेंबर 2022 ते डिसेंबर 2022 या दरम्यान सुमारे 18 कोटीचा व्यवसाय केला असल्याचे या नोटीसमध्ये नमूद होते. ही नोटीस पाहून ही व्यक्ती चक्रावून गेली. कोणताही विक्री व्यवहार या व्यक्तीने कधी केली नाही. त्याने त्यासंदर्भात अधिक चौकशी केली असता दिल्ली येथे त्याचा पॅन क्रमांक वापरून एका घोटाळेबाज व्यक्तीने 18 कोटी रुपयांचा व्यवसाय दाखवून सुमारे 3.5 कोटी रुपये जीएसटीची चुकवेगिरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. घोटाळ्याची साखळी चव्हाट्यावर येण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
पॅन नंबरचा गैरवापर; जिल्ह्यातील दुसरी घटना
सांगलीतील विजयनगर येथे गुजरातमधील व्यापार्याने खोबरे विक्री दाखवून जीएसटी विभागास 4 कोटी रुपयांचा चुना लावला होता. दुसर्या एका प्रकारात जत मध्येही एका शेतमजुराच्या आधार, पॅनचा वापर करून करोडोची बोगस विक्री दाखवून जीएसटी घोटाळा केला होता. त्याचे पुढे काय झाले, हे समजलं नाही. तोपर्यंत जिल्ह्यातील आणखी एका व्यक्तीच्या पॅन नंबरचा वापर करून 3.50 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे.
सध्या सर्वसामान्य करदात्यांना जीएसटी नंबरसाठी आधारसह अनेकस्तरीय पडताळणी करणे आवश्यक असते. तरीही पॅन, आधारकार्डच्या गैरवापराचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. त्याबद्दलही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (crime news)
सांगलीच्या व्यक्तीने केली तक्रार
पॅन कार्ड नंबरचा गैरवापर झाल्याची ऑनलाईन तक्रार सांगलीतील व्यक्तीने जीएसटीच्या पोर्टलवर नोंद केली आहे. पॅन मिसयुज लिंकवरही तक्रार नोंद करण्यात आली आहे.
अशी घ्या दक्षता…
प्रत्येक पॅन नंबर करदात्याने आपल्या नंबरचा गैरवापर होत नाही ना, हे महिन्या -दोन महिन्याच्या अंतराने नियमितपणे पाहिले पाहिजे. त्यासाठी जीएसटी डॉट जीओव्ही डॉट इन या संकेस्थळावर टॅक्स पेयर सर्च मध्ये पॅन टाकला असता त्यास संलग्न जीएसटी क्रमांक समजतो. तसेच अशाप्रकारचे घोटाळे जीएसटी विभागाकडे कळवण्यासाठी सीबीआयसी डॅश जीएसटी डॉट जीओव्ही डॉट इन येथे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.