श्री दत्त (शिरोळ) चा ५१ वा ऊस गळीत हंगाम यशस्वीरित्या संपन्न – चेअरमन गणपतराव पाटील
शिरोळ /प्रतिनिधी:
(local news) श्री दत्त (शिरोळ) चा ५१ वा ऊस गळीत हंगाम यशस्वीरित्या संपन्न झाल्याची माहिती चेअरमन गणपतराव पाटील यांनी दिली. येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२२-२०२३ च्या ५१ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ दिनांक ०६ नोव्हेंबर, २०२२ रोजी झाला व दिनांक १२/०३/२०२३ रोजी सांगता झाली. एकूण १२७ दिवस चाललेल्या या हंगामात ११,४८,६७५ मे. टन उसाचे गाळप होऊन १२.१७ टक्के सरासरी साखर उता-याने १२,३३,६८० पोत्यांचे साखर उत्पादन झाले आहे. कारखान्याने राबविलेल्या विविध ऊस विकास योजना व सभासदांना वेळोवेळी ऊस उत्पादन वाढीसंदर्भात केलेले मार्गदर्शन यामुळे या हंगामात हेक्टरी सरासरी ९९.६० मे. टन उत्पादन मिळाले आहे. यामध्ये आडसाली ऊस १२८.९० मे. टन, पूर्वहंगामी १०९ मे. टन, सुरु ७५.६९ मे. टन व खोडवा ७३.२० मे. टन असे हेक्टरी उत्पादन प्राप्त झाले आहे. एकूण साखर उत्पादन व मार्केटमध्ये साखरेला अपेक्षेप्रमाणे मागणी नसलेमुळे सर्वच कारखान्यांना आर्थिक तोंडमिळवणी करणे अत्यंत अडचणीचे व जिकीरीचे झाले आहे.
अशा परिस्थितीतही कारखान्याने हंगाम २०२२-२०२३ सुरुवातीपासून उपलब्ध झालेल्या उसाचे एफ.आर.पी.प्रमाणे प्रतिटन रुपये २९५०/- प्रमाणे पेमेंट विनाकपात मुदतीत ज्या त्या वेळी सभासदांना अदा केली आहे. चालू हंगामात कारखान्यास पुरवठा झालेल्या सर्व उसाचे प्रतिटन रुपये २९५० प्रमाणे पेमेंट सभासदांच्या खात्यावर वर्ग केले आहे.
या हंगाम सांगता प्रसंगी कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडीत गणपतराव आप्पासाहेब पाटील म्हणाले की, कारखान्याचा सन २०२२-२०२३ चा विस्तारीत क्षमतेचा पहिला गळीत हंगाम यशस्वीरित्या संपन्न झाला. विस्तारीकरणाचे काम चालू असताना कारखान्याचे विस्तारीकरण पूर्ण होईल की नाही अशी संभ्रमावस्ता सभासद बंधू यांचेमध्ये होती. तथापि संबंधित मक्तेदार आणि कारखान्याचे कामगार बंधू यांनी अपार मेहनत घेतल्यामुळे विस्तारीकरणाचे काम केवळ पाच महिन्यामध्ये यशस्वीरित्या पूर्ण केले. तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्या तांत्रिक सल्लागारांनी प्रत्यक्ष कारखान्यास वेळोवेळी भेट देवून मोलाचे मार्गदर्शन केले. त्यामुळे या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. या विस्तारीत हंगामामध्ये सर्व तांत्रिक अहवाल अतिशय चांगल्या पध्दतीने प्राप्त झाले आहेत. पुढील गळीत हंगाम हा पूर्ण क्षमतेने सुरु होणार आहे. तेंव्हा सर्व सभासद बंधूनी आपल्या उसाची नोंद आतापासूनच द्यावी व आपला सर्व ऊस आपल्याच कारखान्यास गळीतास पाठवून सहकार्य करावे अशी विनंती केली. (local news)
तसेच गळीत हंगाम यशस्वी होण्यासाठी सभासद बंधू-भगिनी, तोडणी वाहतूक कंत्राटदार, तोडणी मजूर, वाहतूक कंत्राटदार, कारखान्याचे अधिकारी-कर्मचारी बंधू, तसेच कारखान्याचे हितचिंतक या सर्वांची मोलाची साथ लाभली. हंगामातील सर्वच कामकाज नियोजनबध्द झाले आहे, त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद दिले. कार्यक्रमाचे स्वागत कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पी, अशोकराव निर्मळे, महाराष्ट्र राज्य कामगार संघटनेचे सदस्य राऊ पाटील, प्रॉडक्शन मॅनेजर व्ही. व्ही. शिंदे, वर्क्स मॅनेजर संजॉय संकपाळ यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच ज्येष्ठ व्याख्याते वसंत हंकारे यांचे आनंदी जीवनावर व्याख्यान झाले. आभार कामगार युनियनचे अध्यक्ष बाळासाहेब बनगे यांनी मानले.
याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन अरुणकुमार शंकर देसाई व सर्व संचालक मंडळ, सर्व खाते प्रमुख, कामगार युनियनचे पदाधिकारी, कामगार बंधू व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.