हेर्लेतील वादग्रस्त प्रार्थनास्थळ जमीनदोस्त

हेर्ले येथील संजयनगरमधील वादग्रस्त प्रार्थनास्थळाचे (place of worship) बेकायदेशीर बांधकाम मंगळवारी सकाळी मोठ्या पोलिस बंदोबस्तात प्रशासनाने जमीनदोस्त केले. गावात तणावपूर्ण शांतता असून, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हेर्ले येथे महापुरुषांच्या जयंतीनिमित्त लावलेला डिजिटल शुभेच्छा फलक 24 एप्रिल रोजी अज्ञात समाजकंटकाने फाडल्यानंतर गावात तणाव निर्माण झाला होता. रात्री हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी हातकणंगले पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी संशयितास गजाआड केले.

त्याचवेळी संजयनगर येथे बेकायदेशीर प्रार्थनास्थळाचे (place of worship) बांधकाम केल्याच्या विरोधात हिंदुत्ववादी कार्यकर्ते, महिला व ग्रामस्थांनी 25 एप्रिल रोजी ग्रामपंचायतीवर धडक दिली. त्यावेळी ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांनी बेकायदेशीर बांधकामाची पाहणी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

बांधकाम परवाना व इतर सर्व परवाने शासनाच्या नियमाप्रमाणे आहेत का, हे पाहिले जाईल. बेकायदेशीर बांधकाम चालू असेल व तेथे सामूहिकरीत्या लाऊड स्पीकरवर प्रार्थना केली जात असेल, तर ती थांबविण्याची सूचना करण्यात येईल. तसेच कायदेशीर कारवाई करण्याचे पत्र प्रशासनास दिले.

मात्र, कोणीही हा निर्णय ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने हिंदुत्ववादी कार्यकर्ते व महिलांनी बेमुदत गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार चार दिवस गाव बंद ठेवण्यात आले. त्याचे लोन तालुक्यातील अनेक गावांत पसरले व तेथेही बंद पाळण्यात आला.

हे बेकायदेशीर प्रार्थनास्थळ पाडण्याचा निर्णय घेण्यासाठी ग्रामपंचायत उशीर करीत असल्याने महिला व नागरिकांनी जिल्हा प्रशासनास भेटून हे बेकायदेशीर प्रार्थनास्थळ हटवण्याची मागणी केली. त्यानंतर वरिष्ठांनी त्याची पाहणी केली. 1 मे रोजी सकाळी केंद्र शाळेमध्ये गावामध्ये सामाजिक सलोखा बैठक आयोजित करण्यात आली होती.

इचलकरंजीचे अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खारमोटे यांनी गावात शांतता व सलोखा टिकवून ठेवण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले. या बेकायदेशीर बांधकामाबाबत सर्व अहवालांची शहानिशा करून प्रशासनाने निर्णय घेत मंगळवारी (दि. 2) पाच वाजता या प्रार्थनास्थळाचे बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत संबंधितांना कारवाईची माहिती दिल्यानंतर त्यांनी प्रशासनाला विरोध केला. हा सर्व विरोध मोडून काढत प्रशासनाने हे बांधकाम जमीनदोस्त केले. कारवाईदरम्यान हातकणंगले तहसीलदार कल्पना ढवळे, उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजणे व अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *