कुरुंदवाड येथे गायरान अतिक्रमणधारकांचा भव्य मेळावा संपन्न
पत्रकार नामदेव निर्मळे
(local news) कुरुंदवाड: येथील जैन सांस्कृतिक भवन येथे शनिवार दि. १३ मे२०२३ रोजी गायरान अतिक्रमणधारकांचा भव्य मेळावा संपन्न झाला. शासकीय गायरान जमिनीवर निवास करुन राहणाऱ्या गोरगरीब अतिक्रमणधारकांना शासनाच्यावतीने महसूल अधिनियम१९६६ कलम ५० अन्वये शासकीय व गायरान जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करण्याबाबत तहसिल कार्यालयाद्वारे तलाठी यांच्यामार्फत नोटिसा दिल्या आहेत.या नोटीसामधील जाचक अटी व शर्तींना कायदेशीररित्या न्यायकक्षेत कसे संरक्षण देता येईल?याबाबत कायदेतज्ज्ञ व लोकप्रतिनिधींनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक निमंत्रक पांडुरंग गायकवाड यांनी केले. मेळाव्याचे उद्घाटन हायकोर्टाचे वकिल अॅड.डॉ. सुरेश माने यांनी केले.यावेळी लोकमोर्चाचे अध्यक्ष – सुभाष गुंडे,माजी जिल्हाधिकारी – बी.जी.वाघ, हायकोर्टाचे माजी न्यायाधीश अनिल वैद्य,माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी,विश्वास बालिघाटे, आम आदमी पार्टीचे आदम मुजावर यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले,- प्रथम धनदांडग्यांचे अतिक्रमण काढा. गोरगरिबांना त्रास दिलात तर रस्त्यावरच्या लढाईत स्वाभिमानी शेतकरी संघटना अतिक्रमणधारकांच्या सोबत असेल.असे अतिक्रमणधारकांना आश्वासित केले.
अॅड.डॉ.सुरेश माने मार्गदर्शन करताना म्हणाले, -संविधानाने स्वाभीमानाने जगण्याचा अधिकार दिला.पण सर्वांना घरे देण्याची जबाबदारी कोणाची? इंग्रजांनी,निजामानी,लोकांना जमिनी दिल्या.शाहू महाराजांनी भटक्या विमुक्तांनाही वसाहती निर्माण करुन घरे दिली.पण आताचे सरकार डोक्यावरील छप्पर काढून घेण्याचे पाप करीत आहे. १९७८, १९९०, २००२, २००७, २०११ चा शासन आदेश निघाला अतिक्रमण नियमानुकूल करण्याचे पण कृती शून्य. धनदांडग यांनी लुबाडलेल्या जमिनी काढून घेण्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितलेल्या आहेत पण जे भूमिहिन,दलित,आदिवासी, आर्थिकदृष्टया कमकुवत असणाऱ्या घटकांनाही त्यांची अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचे सांगूनही कार्यवाही नाही. (local news)
धनदांडग्यांना नोटीस नाही पण गोरगरिब लोकांना नोटीसा बजावल्या. यामध्ये भेदभाव करता येणार नाही.३० दिवसांमध्ये ६ पानांच्या उतरांचा नमुना २५ मुद्यांच्या आधारे सामूहिक तहसिल कार्यालयामध्ये मोर्चाने नोटीसीला उत्तर सादर करा.३प्रतीत सादर करा.त्याची पोहोच घ्या.६ महिन्यांवरील अतिक्रमण काढता येणार नाही. सर्वशक्तिनीशी लोक आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. याप्रसंगी अतिक्रमणधारक मोठया संख्येने उपस्थित होते.