सांगली : पोलिसांना हवाय मिरजेचा ‘जग्वार’!
(crime news) ‘जग्वार’…पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार…एक नव्हे…दोन नव्हे…तर पाच गुन्हे दाखल असलेला हा जग्वार सध्या पोलिसांना हवाय. संपूर्ण जिल्ह्यात नशेच्या गोळ्यांचा पुरवठा करून तरुण पिढीला विनाशाकडे नेणार्या जग्वारच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पायाला अक्षरक्ष: ‘भिंगरी’ बांधली आहे. तरीही त्याचे कुठेच ‘दर्शन’ होईना झाले आहे. रातोरात तो गायब झाला असला तरी त्याचे साथीदार मात्र पडद्याआड राहून नशेच्या गोळ्यांचा पुरवठा करीतच आहे.
मिरजेत गुन्हा दाखल
जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. बसवराज तेली यांनी पंधरा दिवसापूर्वी सांगली, मिरजेसह संपूर्ण जिल्ह्यात ‘कोम्बिंग ऑपरेशन’ मोहीम राबविली. यामध्ये अनेक सराईत गुन्हेगार सापडले. सात पिस्तुले, काडतुसे सापडली. मिरजेतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तुलाबरोबर 280 नशेच्या गोळ्या सापडल्या. चौकशीत या गुन्हेगाराने जग्वारकडून गोळ्या घेऊन ज्यादा दराने त्याची तरुणांना विक्री करीत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी जगवारविरूद्ध मिरजेत गुन्हा दाखल केला. याची कुणकूण लागताच तो रातोरात पसार झाला.
कोल्हापुरातून खरेदी
कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर व हातकणंगले येथून जग्वार नशेच्या गोळ्यांचे बॉक्सच खरेदी करतो. दहा रुपयांची ही गोळी तो पन्नास रुपयाला विकतो. सराईत गुन्हेगारांच्या टोळ्या जग्वारच्या संपर्कात आहेत. त्यांनाच तो गोळ्यांचा पुरवठा करतो. पुढे हे गुन्हेगार तरुणांना जवळपास शंभर रुपयाला एक गोळी विकतात. शरीराला घातक ठरणार्या गोळ्यांचा जिल्ह्यात बाजारच मांडला आहे. (crime news)
गुन्हेगारांचे नेटवर्क
सध्या जग्वार हाच नशेच्या गोळ्यांचा पुरवठा करणारा मुख्य सुत्रधार असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हेगारांचे नेटवर्क प्रस्थापित करून त्याने त्यांच्यामार्फत गोळ्यांच्या विक्रीचा धंदा सुरू ठेवला आहे. शरिराला घातक ठरणार्या गोळ्यांची तरुण पिढीला खूप सवय लागली आहे. गोळ्या नाही मिळाल्या तर ते कोणत्याही थराला जात असल्याचे चित्र आहे. गोळ्यांचे सेवन करण्यासाठी कोणताही गुन्हा करण्यास मागे-पुढे पाहत नाहीत. गेल्या सहा महिन्यात घडलेले गुन्हे गोळ्यांचे सेवन करून केल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्थानबद्ध करण्याच्या हालचाली
जग्वार याच्याविरूद्ध आतापर्यंत सहा गुन्हे दाखल झाले आहेत. त्याला यापूर्वी अनेकदा अटक करण्यात आली आहे. मात्र, जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच राहिल्या. त्यामुळे आता त्याच्याविरूद्ध झोपडपट्टीदादा कायद्यांतर्गत कारवाई करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या कायद्यांतर्गत जग्वारला कारागृहात एक ते दीड वर्ष स्थानबद्ध केले जाण्याची शक्यता आहे.