सांगलीनंतर कोल्हापुरात फिल्मी स्टाईलने धाडसी दरोडा

(crime news) सांगलीतील दरोड्याची घटना ताजी असतानाच आता कोल्हापूरमध्ये दरोड्याची घटना उघडकीस आली आहे. कोल्हापुरमधील बालिंगा येथे कात्यायनी ज्वेलर्स या दुकानावर धाडसी दरोडा पडल्याची घटना घडली. गुरुवारी दुपारी दिवसाढवळ्या हातात बंदुक घेऊन दरोडेखोर दुकानात घुसले. मग बंदुकीच्या धाकावर तब्बल एक कोटी 85 लाख रुपयांच्या मुद्देमालासह 2 लाख रुपयांची रोख रक्कम लुटल्याची प्राथमिक माहिती मिळते. दुकानदाराने विरोध केल्याने दरोडेखोरांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दुकानदार आणि त्याचा सहकारी गंभीर जखमी झाले आहेत. दरोडा सुरु असताना बाहेर जमाव जमला होता. या जमावावर सुद्धा दरोडेखोरांनी गोळीबार करण्याचा प्रयत्न केला.

शंकर माळी असे मालकाचे, तर जितू माळी असे जखमी सहकाऱ्याचं नाव आहे. गोळीबारात रमेश यांच्या हाताला गंभीर इजा झाली असून, जितू यांच्या कंबरेजवळ गोळी आरपार झाली. दोघांवरही कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

भरदुपारी घडली लुटीची घटना

कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावरील बालिंगा येथे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. दुपारी दोनच्या सुमारास दुचाकीवरुन आलेले दोघे दरोडेखोर दुकानात घुसले. त्यांनी बंदुकीच्या धाकावर दुकान लुटण्यास सुरवात केली. मात्र दुकानमालक आणि त्याच्या सहकाऱ्याने दरोडेखोरांना प्रतिकार करण्यास सुरुवात केली. पूर्ण ताकदीनिशी दोघांनी आरोपींशी दोन हात करण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला. आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला. (crime news)

घटना सीसीटीव्हीत कैद

दरोड्याची थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यानंतर लुटलेला मुद्देमाल घेऊन आरोपी पळून जात असताना काही तरुणांनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण आरोपींनी तरुणांच्या दिशेने गोळीबार केल्याने तरुणांचा नाईलाज झाला. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *