कर्नाटकच्या नव्या पुलांमुळे शिरोळला महापुराचा जादा फटका बसणार?
आतापर्यंत आलेल्या महापुरांमुळे शिरोळ तालुक्याबरोबरच संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला कोट्यवधीचा फटका बसला असून, या भागातील शेतकरी आता हतबल झाला आहे. अशातच कर्नाटक सरकारकडून नव्याने सीमाभागात पुलांची निर्मिती केली जात आहे. या पुलांच्या भरावामुळे महापुराचा (flood) आणखी किती फटका बसणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. संभाव्य महापुराचा विचार करून काय उपाययोजना केल्या पाहिजेत, याचीही नोंद घेतलेली नाही.
कृष्णा नदीचे खोरे हे प्रंचड मोठे आहे. महाबळेश्वर येथे उगम पावणारी नदी आंध्र प्रदेशमधील राजमहेंद्री येथे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. कृष्णा नदीच्या खोर्याचे क्षेत्रफळ 2 लाख 58 हजार 948 चौरस किलोमीटर असून, 28 हजार 700 चौरस किलोमीटर महाराष्ट्रात, तर कर्नाटकातील क्षेत्रफळ 1 लाख 13 हजार 271 चौरस किलोमीटर तसेच आंध— प्रदेशमध्ये 27 हजार 252 चौरस किलोमीटर आहे. कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणामुळे सातत्याने पश्चिम महाराष्ट्राला मोठ्या महापुराला (flood) सामोरे जावे लागत आहे. असे असताना कर्नाटक सरकार सीमाभागात अनेक नव्या पुलांची निर्मिती करीत आहेत.
काही पूल, तर काही पूल वजा बॅरेज उभारण्यात येत आहेत. महापुराचे उदाहरण समोर असताना मोठ्या प्रमाणात उंच स्वरूपाचे भराव घालून हे पूल उभारण्यात येत आहेत. याकडे मात्र राज्य सरकारने कोणत्याही प्रकारे लक्ष दिले नाही, यामुळे गेल्या वर्षभरापासून या होत असलेल्या पुलांना शिरोळ तालुक्यातून मोठा विरोध होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने होत असलेल्या पुलांवर कमानीचे निर्बंध घालण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
सध्याचे कृष्णेवरील पूल
कराड, रेठरे, ताकारी, अमणापूर, सुखवाडी, भिलवडी, मौजे डिग्रज, सांगली बायपास, सांगली आयर्विन व अन्य एक, उदगाव-अंकली 3, मिरज-अर्जुनवाड, नृसिंहवाडी 2, टेंभू, ताकारी, म्हैसाळ येथे जलसंपदा विभागाचे बंधारे, कोथळी-हरिपूर असे 20 हून अधिक जुने-नवीन पूल आहेत. नवीन पूल खिद्रापूर-जुगुळ, सैनिक टाकळी-चंदूर टेक, यडूर-कल्लोळ, उगार-कुडची, एकसंबा-दत्तवाड असे पाच नवीन पूल होत आहेत. त्याचबरोबर अनेक पूल प्रास्ताविक आहेत.