जग बदलण्यासाठी दगड नाही, फुल टाकण्याची क्षमता निर्माण व्हावी : ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस

शिरोळ/ प्रतिनिधी:

सध्याचा काळ हा अतिशय संशयाचा आणि संभ्रमाचा आहे. असेच होत गेले तर संवेदनशील माणसाला हे जग जगायच्या लायकीचे राहिलेले नाही असे वाटते. आपल्याला जगायचेच असेल तर, हे जग सुंदर पद्धतीने बदलण्यासाठी आपला एक दगड नाही तर एक फुल टाकण्याची क्षमता आपल्यात निर्माण व्हावी, असे मत ज्येष्ठ साहित्यिक (Literary) प्रा. डॉ. राजन गवस यांनी व्यक्त केले.

शिरोळ येथील दत्त कारखाना कार्यस्थळावर डॉ. मोहन पाटील अमृत महोत्सव सत्कार समितीच्या वतीने आयोजित समारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील होते.

ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांनी डॉ. मोहन पाटील यांच्या साहित्याचा परिचय करून देताना त्यांचे साहित्य अतिशय उत्तम दर्जाचे, गाव आणि परिसरातील लोकांच्या भावभावनांचा विचार करून नवे साहित्य मूल्य निर्माण करणारे असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात गणपतराव पाटील म्हणाले, जगामध्ये परिवर्तन आणण्याची क्षमता ही फक्त लेखक आणि साहित्यकांमध्ये असते. अनेक चळवळी या साहित्यिकांनी (Literary) निर्माण केलेल्या आहेत. साहित्यिकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नव्या बदलाला सामोरे जात आपल्या विचारापासून नवीन साहित्य निर्माण करावे आणि येणाऱ्या पिढीसमोर नवनिर्मितीचा आदर्श ठेवावा. डॉ. मोहन पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना आपल्या साहित्यिक घडामोडीचा ऊहापोह करीत मी आणि ते यामधील नातेसंबंध दृढ करीत एक चांगली समाज व्यवस्था निर्माण करता येते, चांगले साहित्य विश्व निर्माण करता येते असे सांगितले. प्रारंभी स्व. सा.रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले. स्वागत नीलम माणगावे यांनी तर प्रास्ताविक डॉ. महावीर अक्कोळे यांनी केले. मानपत्राचे वाचन किरण पाटील यांनी केले.

अमृत महोत्सवानिमित्त डॉ. मोहन पाटील यांचा सपत्नीक सत्कार मान्यवर व डॉ. राजश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. सुनंदा शेळके यांनी केले तर आभार डॉ. सुभाष शेळके यांनी मानले. सर्व मान्यवरांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. यावेळी महेंद्र बागे, धनाजी पाटील नरदेकर, पंडित काळे, दशरथ पारेकर, नामदेव माळी, महेश कराडकर, भीमराव धुळबुळू, सुनील इनामदार, संजय पाटील, सदानंद कदम, संजय सुतार, प्रकाश मेटकर, शांताराम कांबळे, वाय. एम. चव्हाण, गोमटेश पाटील, मनीषा डांगे आदी साहित्यप्रेमी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *