श्री दत्त कारखान्याच्या सहकार्यातून नदी प्रदूषणाबाबत लोकांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणार : जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांचे प्रतिपादन
शिरोळ/ प्रतिनिधी:
(local news) श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या माध्यमातून प्रदूषणमुक्त साखर कारखाना, शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून हजारो हेक्टर क्षारपड जमिनीला सुधारण्याचा चांगला उपक्रम आणि पर्यावरण जपण्याचे काम हे मोठ्या प्रमाणात होत आहे. लवकरच ‘चला जाणूया नदीला’ या उपक्रमांतर्गत श्री दत्त कारखान्याच्या सहकार्यातून नदी प्रदूषणाबाबत लोकांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम केले जाईल, असे प्रतिपादन प्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी केले. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यास त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेग्गान्ना, कॉन्ट्रॅक्टर कीर्तीवर्धन मरजे यांनी लॅपटॉपवरून दत्त कारखान्याच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांची आणि ऊस विकास योजनांची माहिती दिली. गणपतराव पाटील यांनी सेंद्रिय कर्ब वाढीचे प्रयत्न, कारखान्याच्या वतीने उत्पादित करण्यात येत असलेले कंपोस्ट खत, त्याच पद्धतीने जमीन क्षारपड होण्याची कारणे, क्षारपडमुक्तीचे उपाय, 19 गावात क्षारपड मुक्तीचे होत असलेले काम, सच्छिद्र निचरा प्रणालीचे फायदे, ठिबक सिंचन योजना, कारखान्याकडून करण्यात येत असलेले मोफत माती, पाणी आणि पाने परीक्षणाची माहिती दिली.
आठ हजार एकरावर क्षारपडमुक्तीचे काम झाल्याचे पाहून आणि एकरी एक लाख रुपये खर्च करून दोन वर्षात शेतकऱ्यांनी परतफेड केल्याचे ऐकून त्यांनी खूपच समाधान व्यक्त करून केलेल्या कामाचे कौतुक केले. तसेच शासनाने क्षारपड जमीन सुधारणा कामाला प्रोत्साहन द्यावे असे मतही व्यक्त केले. स्व. सा. रे. पाटील यांच्या सोबतच्या आठवणीही राजेंद्र सिंह राणा यांनी ताज्या केल्या. तसेच गणपतराव पाटील यांनी स्व. सा. रे. पाटील यांच्या विचारांचा वारसा जपत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांचा आणि त्यांच्याबरोबर आलेल्या इतर पाहुण्यांचा गणपतराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (local news)
यावेळी डॉ. सुमंत पांडे, नरेंद्र च्युघ, उदय गायकवाड कोल्हापूर, श्री. रहाणे वर्धा, रिटा रोड्रिग्यूस इचलकरंजी तसेच कारखाना संचालक महिंद्र बागी, शेखर पाटील, प्रमोद पाटील, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, सेक्रेटरी अशोक शिंदे, सुदर्शन तकडे, शक्तीजीत गुरव आदी उपस्थित होते.