सांगलीत भाजी विक्रेत्याचा भोसकून खून
(crime news) उसने घेतलेल्या दोन हजार रुपयांसाठी पांडुरंग रघुनाथ कुंभार (वय 28) या भाजी विक्रेत्याचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे शिलेदार ढाब्याजवळ सोमवारी रात्री ही घटना घडली. घटनेनंतर पसार झालेल्या श्रीधर जगन्नाथ जाधव (वय 29, रा. कसबे डिग्रज) या हल्लेखोराला अवघ्या चार तासांत हातकणंगले (जि. कोल्हापूर) येथे अटक करण्यात सांगली ग्रामीण पोलिसांना यश आले. त्याने खून केल्याची कबुली दिली आहे. खून करण्यासाठी वापरलेला चाकू जप्त करण्यात आला आहे. पांडुरंग कुंभार व श्रीधर जाधव हे दोघे मित्र होते.
पांडुरंग भाजी विक्रीचा व्यवसाय करीत होता. चार दिवसापूर्वी श्रीधर याने त्याच्याकडून दोन हजार रुपये उसने घेतले होते. दोन दिवसात या पैशाची परतफेड करतो, असे त्याने सांगितले होते. मात्र त्याने पैसे दिले नाहीत.पांडुरंगने त्याला सोमवारी दुपारी पैशाची मागणी केली. याचा श्रीधरला राग आला होता. दोघांत जोरदार वादही झाला.
श्रीधरने रात्री पांडुरंगला मोबाईलवर संपर्क साधून ‘तुझे पैसे देतो, तू शिलेदार ढाब्याजवळ ये’, असे सांगितले. त्यानुसार पांडुरंग पैसे घेण्यास गेला. श्रीधरने त्याला ‘तू मला लगेच पैसे का मागितलेस’, अशी विचारणा केली. यातून त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. संतप्त झालेल्या श्रीधरने खिशातील चाकू काढून पांडुरंगला भोसकले. चाकूचा वार वर्मी बसल्याने पांडुरंग रक्ताच्या थारोळ्यात पडला. परिसरातील लोकांनी त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. पण वैद्यकीय अधिकार्यांनी तो मृत झाल्याने घोषित केले. (crime news)
ग्रामीण पोेलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. घटनेनंतर श्रीधर हातकणंगले येथे सासरवाडीत लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड, हवालदार संतोष माने, मेघराज रुपनर यांच्या पथकाने त्याला पहाटे पकडले.