श्री दत्त कारखाना कार्यक्षेत्रातील 55 शेतकरी ज्ञानयोग प्रशिक्षणास रवाना
शिरोळ/ प्रतिनिधी:
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथे शेतकऱ्यांकरिता ‘ज्ञानयोग प्रशिक्षण कार्यक्रम’ आयोजित केला आहे. या प्रशिक्षणासाठी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कारखाना कार्यक्षेत्रातील 55 शेतकरी (farmer) सभासद व एक शेती विभागातील कर्मचारी आज रवाना झाले. दत्त कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी गाडीचे पूजन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
दि. 27 जून ते 30 जून या चार दिवसाकरिता हे ज्ञानयाग प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. यामध्ये ऊस शेतीशी निगडित असणारी ऊस लागवड, पूर्व मशागत, नवीन सुधारणा, नवीन बियाणे, नवे तंत्रज्ञान, ऊस उत्पादन वाढ याचबरोबर ऊस तोडणी पर्यंतचे समग्र मार्गदर्शन केले जाणार आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मधील सर्व प्रमुख शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन या शेतकऱ्यांना होणार आहे.
श्री दत्त साखर कारखान्याच्या माध्यमातून आणि चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस विकास योजनेअंतर्गत ऊस उत्पादन वाढीसाठी नेहमीच विविध उपक्रम राबवले जातात. चर्चासत्रे, मेळावे, शेतीतज्ज्ञ, शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन, व्याख्याने नेहमीच घेतली जातात. याचा फायदा शेतकऱ्यांना होत असून एकरी शंभर टनाच्या वर उत्पादन घेतले जात आहे. ऊस उत्पादन घेत असताना नवीन तंत्रज्ञानाची आणि ऊस शेती संदर्भातील सर्व अत्याधुनिक माहिती शेतकऱ्यांना (farmer) मिळावी हा उद्देश घेऊन कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांना या प्रशिक्षण शिबिरासाठी पाठवण्यात आले आहे. या शिबीरामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा, माती परीक्षक ए. एस. पाटील, अंबादास नानिवडेकर, संतोष दुधाळे, दादा काळे, शक्तीजीत गुरव यांच्यासह प्रशिक्षणास जाणारे शेतकरी उपस्थित होते.