सांगली : ‘जग्वार’सह तिघांना अखेर अटक
(crime news) शरीराला घातक ठरणार्या व तरुण पिढीला नशेच्या आहारी नेणार्या नशेच्या गोळ्यांची विक्री करणार्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने रविवारी दुपारी अटक केली. यामध्ये मुख्य सूत्रधार ‘जग्वार’चा समावेश आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तो पोेलिसांना गुंगारा देत फरारी होता. औषध विक्री प्रतिनिधी (एमआर) तसेच औषध विक्रेत्यांना हाताशी धरून त्याने संपूर्ण जिल्हाभर नशेच्या गोळ्यांचा बाजार मांडला होता.
अटक केलेल्यांमध्ये शहाबाज उर्फ जग्वार रियाज शेख (वय 24, रा. साईनाथनगर, पसायदान शाळेसमोर, कर्नाळ रस्ता, सांगली), वैद्यकीय प्रतिनिधी सचिन सर्जेराव पाटील (29, वंजारवाडी, ता. तासगाव) व औषध विक्रेता अमोल शहाजी चव्हाण (28, बेंबळे चौक, टेंभूर्णी, ता. माढा, जि. सातारा) यांचा समावेश आहे. त्यांच्याविरूद्ध औषधी व सौंदर्य प्रसाधने अधिनियम कायद्यांतर्गत शहर पोेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस हवालदार विक्रम खोत यांनी फिर्याद दाखल केली आहे.
सांगली, मिरजेसह जिल्ह्यात नशेच्या गोळ्यांची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. बसवराज तेली यांनी या गोळ्यांची विक्री करणार्या टोळीची पाळेमुळे खणून काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे अन्वेषणचे पथक गेल्या दोन महिन्यांपासून काही संशयितांना अटक करून गोळ्या जप्तीची कारवाई करीत आहे. प्रत्येक कारवाईमध्ये या गोळ्या ‘जग्वार’ देत असल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिस मागावर असल्याची चाहूल लागताच तो प्रसार झाला होता. रविवारी दुपारी तो कर्नाळ रस्त्यावरील शिवशंभो चौकात जाणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषणचे हवालदार विक्रम खोत यांना मिळाली होती.
पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक कर्नाळ रस्त्यावर सापळा लाऊन होते. मिळालेल्या माहितीनुसार ‘जग्वार’ या मार्गावरून जात होता. त्याला ताब्यात घेतले. आतापर्यंत जग्वारविरूद्ध चार ते पाच गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रत्येक गुन्ह्यात तो हवा होता. त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने या गोळ्या औषध प्रतिनिधी सचिन पाटील व विक्रेता अमोल चव्हाण यांच्याकडून खरेदी करून त्या जादा दराने विक्री करीत असल्याची कबुली दिली. आतापर्यंत दाखल झालेल्या गुन्ह्यात त्याच्या साथीदारांना अटक झाली होती. या सर्व गुन्ह्यात 330 गोळ्या जप्त केल्या होत्या. जग्वार हा या दोघांकडून गोळ्या घेऊन त्यांचा संपूर्ण जिल्हाभर पुरवठा करीत होता. संशयित सचिन पाटील व अमोल चव्हाण यांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय या गोळ्या द्यायच्या नाहीत, असा नियम आहे. तरीही ते जादा पैसे मिळत असल्याने या गोळ्या ते जग्वारला देत होते, अशी माहिती चौकशीतून पुढे आली आहे. (crime news)
पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशाणदार, उपनिरीक्षक विशाल येळेकर, हवालदार विक्रम खोत, अनिल कोळेकर, बिरोबा नरळे, सागर लवटे, संदीप गुरव यांच्या पथकाने ही कारवाई केली.