शिरोळात राष्ट्रवादीचा फायदा यड्रावकर गटाला हत्तीचे बळ देणारा ठरणार
राज्यातील राजकीय घडामोडीमुळे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून निष्ठा असलेल्या यड्रावकर गटाला शिरोळ तालुक्यात आणखी बळ मिळाले आहे. त्यामुळे तालुक्यात स्वाभिमानी, शिवसेना (ठाकरे गट) व काँग्रेस हे तीन पक्ष यड्रावकर यांच्या विरोधात असल्याने या सत्तेत सामील झालेल्या राष्ट्रवादीचा फायदा यड्रावकर गटाला (political party) हत्तीचे बळ देणारा ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 1999 साली झाली. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यात सर्वप्रथम स्व. सहकारमहर्षी शामराव पाटील यड्रावकर यांनी शरद पवार यांच्याबरोबर जाऊन राष्ट्रवादीशी संधान बांधले होते. त्यानंतर शामराव पाटील यड्रावकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी मदत केली होती. त्यानंतर 1999 साली राष्ट्रवादीतून शामराव पाटील यड्रावकर यांनी शिरोळ विधानसभा निवडणूक लढविली. यात शामराव पाटील यड्रावकर यांचा पराभव झाला. तर 2004 साली काँग्रेस-राष्ट्रवादीची युती झाल्याने विधानसभेचे तिकीट रजनीताई मगदूम यांना दिले. यात यावेळी राजेंद्र पाटील यड्रावकर, राजू शेट्टी असे 3 उमेदवार होते. यात शेट्टी निवडून आले. त्यानंतर परत 2014 साली राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा पराभव झाला.
यड्रावकर कुटुंबीयांनी स्थापनेपासून राष्ट्रवादीशी निष्ठा राखून पक्ष वाढविला. त्याचबरोबर शरद पवार यांच्या नावाने शरद कारखान्यासह अनेक कॉलेज व उद्योगांची निर्मिती केली. शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील राष्ट्रवादी म्हणजेच यड्रावकर गट असे समीकरण होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याशी एकनिष्ठ नाते होते. असे सर्व असतानाही 2019 च्या निवडणूकीत राष्ट्रवादी पक्षाने राजेंद्र पाटील यड्रावकर यांना उमेदवारी न देता स्वाभिमानीचे उमेदवार सावकार मादनाईक यांना पाठींबा दिला. अशा या घडामोडीत राष्ट्रवादीवर निष्ठा ठेवूनही राजेंद्र पाटील यड्रावकर यांना तिकीट न दिल्याने अपक्षाचा झेंडा हातात घेऊन निवडणूकीत विजय झाले.
राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवसेनेला (political party) पाठींबा दिला आणि ते मंत्री झाले. त्यानंतर शिंदे गटाच्या बंडातही ते शामील झाल्याने सत्तेत आमदार आहेत. शिरोळच्या विकासकामासाठी 800 हून अधिक कोटी रुपयांचा निधी खेचून आणला आहे. सध्या अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार सत्तेत सामील होवून मंत्री झाले आहेत. आता सत्तेत भाजप, शिंदे गट शिवसेना व राष्ट्रवादी आली आहे. त्यामुळे यड्रावकर यांना नवी ताकद मिळाली आहे.
विरोधकांना नवे आव्हान
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हा मूळचा गट राष्ट्रवादीचा आहे. आता सत्तेत शिंदे गट शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी असल्याने यड्रावकर गटाच्या बळाला झालर मिळाली आहे. तर तालुक्यात स्वाभिमानी, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट हे विरोधातील पक्ष असून या विरोधकांसमोर आता नवे आव्हान उभे ठाकले आहे.