कोल्हापुरात ग्रीन सिग्नल? शहरासाठी मोठी अचिव्हमेंट

कोल्हापुरात असलेल्या रेल्वे स्टेशनमुळे शहराचे दोन भाग झाले आहेत. वाहनचालकांना किमान परीख पुलाखालून ये-जा करता येते. मात्र, पादचार्‍यांना त्याचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे महापालिकेने रेल्वे रूळावरून पादचारी उड्डाण पुलाचा (flyover) प्रस्ताव तयार केला आहे. सुमारे अडीच कोटींचा प्रस्ताव असून, रेल्वे विभागाकडून मुंबईतील बैठकीत ग्रीन सिग्नल मिळण्याची दाट शक्यता आहे. हा पूल उभारल्यास नागरिकांसाठी शहराचा उत्तर-दक्षिण भाग जोडला जाणार आहे. एस. टी. स्टँडवरून राजारामपुरीकडे जाणार्‍या पादचार्‍यासाठी सुकर होणार असून शहरासाठी मोठी अचिव्हमेंट असेल.

कोल्हापुरात रेल्वे स्टेशन झाल्यापासून एस. टी. स्टँड ते राजारामपुरी, शाहूपुरीकडे रूळावरूनच नागरिकांची ये-जा होत होती. कालांतराने शहराच्या नागरिकरणात वाढ झाली. शाळा, महाविद्यालयासाठी ग्रामीण भागातून विद्यार्थी येऊ लागले. भाजीपाल्यासह व्यापार, व्यवसायासाठीही वर्दळ वाढली. नोकरदारवर्ग येऊ लागले. रेल्वे मार्गामुळे दुभागलेल्या एका भागाकडे एस. टी. स्टँड, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंचन भवन, सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभाग, जिल्हा पोलिस मुख्यालयासह बहुतांश शासकीय कार्यालये आहेत. तर दुसर्‍या भागाकडे शिवाजी विद्यापीठ, विविध महाविद्यालये, शाहूपुरी व राजारामपुरी व्यापारी वर्गासह मोठ्या प्रमाणात रहिवासवर्ग आहे. त्यामुळे रूळावरून जाणार्‍या पादचार्‍यांची संख्याही वाढली. रेल्वेच्या संख्येतही वाढ झाली. धावत्या रेल्वेच्या रूळावरूनच नागरिकांची वाटचाल सुरू राहिली. परिणामी, रेल्वेखाली सापडून अपघातही घडले.

सुरक्षिततेसाठी रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंकडील भाग जोडण्यासाठी महापालिकेने 2018-18 मध्ये 1 कोटी 85 लाखांचा लोखंडी पुलाचा प्रस्ताव तयार केला. पायाभूत सुविधा अंतर्गत जिल्हा नियोजन समितीला प्रस्ताव सादर केला. नगरोत्थान योजनेतून 70 टक्के व महापालिका 30 टक्के असा हिस्सा ठरला. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने महापालिकेकडे 80 लाख रु. वर्ग केले. प्रशासकीय मान्यतेनंतर 1 कोटी 23 लाख रु. कामाची निविदाही प्रसिद्ध केली. रेल्वेला 33 लाख 29 हजार रु. शुल्कही भरलेे. परंतु, रेल्वे विभागाने डिझाईनला मंजुरी दिली नाही. त्यानंतर महापालिकेने सातत्याने पाठपुरावा केला. दरम्यान, रूळावरून ये-जा वाढल्याने रेल्वे विभागाने भिंती उभारून रस्ताच बंद केला आहे. त्यामुळे परीख पुलाखालून नागरिक जीव मुठीत घेऊन ये-जा करत आहेत.

पादचारी उड्डाण पुलाची (flyover) लांबी 54 मीटर आहे. परंतु, रेल्वे विभागाच्या मतानुसार रेल्वे रूळाच्या मध्ये कुठेही लोखंडी कॉलम न टाकता संपूर्ण लांबीचा एकच पूल बांधण्यात यावा. परंतु, एवढ्या लांब एकच पुलाऐवजी 30 मीटर लांबीचे दोन किंवा 17 मीटर लांबीचे तीन असे रेल्वे रूळाच्या मधोमध लोखंडी कॉलम उभारून पूल साकारता येईल, असे महापालिकेचे मत आहे. त्यावर मुंबईतील बैठकीत ठोस चर्चा होऊन डिझाईनवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. महापालिकेने केलेले पुलाचे अंदाजपत्रक 2017-18 सालचे असल्याने आतापर्यंत दरवर्षी त्यात डीएसआरनुसार 10 ते 15 टक्के वाढ धरावी लागणार आहे. परिणामी, पादचारी उड्डाण पुलाचे बजेट सुमारे अडीच कोटींवर जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *