सीपीआरला गरज नव्या कॅथ लॅबची
छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात सध्याच्या कॅथलॅबची (cathlab) मुदत (10 वर्षे पूर्ण) संपत आल्याने आता नव्या कॅथलॅबची गरज आहे. अत्यंत गरजेची असणारी ही मशिनरी सीपीआरला मिळावी, यासाठी सीपीआरच्या हृदयशस्त्रक्रिया विभागाने राज्य शासनाकडे प्रस्ताव दिला आहे, परंतु या प्रस्तावास अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय हे जिल्हा रुग्णालय म्हणून परिचित असले तरी या रुग्णालयात कोकण, शेजारचा सांगली जिल्हा आणि बेळगावमधूनही रुग्ण येत असतात. या रुग्णालयातील हृदयशस्त्रक्रिया विभागात तर रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. दरमहा दीडशे रुग्णांच्या तपासण्या होतात. सध्या येथे असणारी कॅथलॅब ही 2014 मध्ये बसविण्यात आली आहे. याला ऑक्टोबर 2024 मध्ये 10 वर्षे पूर्ण होणार आहेत. तोपर्यंत नवीन कॅथलॅब बसविणे गरजेचे आहे. अन्यथा या विभागाच्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विभागाने आतापासूनच यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
नव्या कॅथलॅबसाठी (cathlab) 16 कोटींची गरज आहे. तसा सविस्तर प्रस्ताव विभागामार्फत राज्यशासनाकडे देण्यात आला आहे. पहिली पाच वर्षे कंपनीकडे देखभाल दुरुस्ती असते. त्यानंतरच्या सेवेसंदर्भात करार करावा लागतो. या सर्व बाबींची सविस्तर माहिती शासनाला प्रस्तावाद्वारे देण्यात आली. राज्यशासनाकडे सीपीआरच्या देखभाल, दुरुस्ती तसेच इतर मशिनरीला निधी मिळविण्याचे अनेक प्रस्ताव दाखल आहेत. त्यासाठीही निधीची आवश्यकता आहेच.परंतु कॅथलॅबला प्राधान्याने निधी मिळाला पाहिजे.