“गुरुनिष्ठा माझ्या रक्तात; कागलमधूनच विधानसभा लढवणार”

(political news) मी भारतीय जनता पक्षातच आहे. माझे राजकीय गुरू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ना. चंद्रकांत पाटील आहेत. गुरुनिष्ठा माझ्या रक्तात आहे. श्वास असेपर्यंत मी त्यांना सोडणार नाही, अशा शब्दात भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. रेकॉर्डब्रेक मार्जिनने कागलचा कोंढाणा आता सर करायचा

कागल तालुक्यात काहींनी अनेक वेळा गुरु बदलले, मात्र मी गुरु बदलणार नाही. कागल विधानसभा निवडणूक लढविणार आणि मताधिक्याने जिंकणार आहे. आता कार्यकर्त्यांनी झोपायचे नाही आणि विरोधकांना देखील झोपू द्यायचे नाही. निवडणुकीच्या विजयाचा प्रारंभ आता झाला आहे, असेही ते म्हणाले. गुरुवारी कागल येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते.

समरजित घाटगे म्हणाले, कार्यकर्त्यांना नेमके सांगायचे काय? या विवंचनेतून नि:शब्द आणि हताश होतो. अशा अवस्थेत बाहेर पडणेही शक्य नव्हते. कार्यकर्त्यांशी काय बोलावे, हे सुचत नव्हते म्हणून नॉट रिचेबल होतो. या घडामोडींदरम्यान अनेक पक्षांच्या नेत्यांचे फोन आले. स्व. विक्रमसिंह घाटगे यांची प्रेरणा घेऊन मी काम करत आहे. माझे गुरू देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील आहेत. श्वास असेपर्यंत मी गुरू बदलणार नाही.

राज्यभर समरजीत घाटगे नॉट रिचेबल असल्याची बातमी झाली. यावरून आपली ताकद लक्षात घ्या, असे सांगून घाटगे म्हणाले, कागलमध्ये परिवर्तन होत आहे. कागल मतदारसंघाकडेे राज्याचे लक्ष आहे. 2019 साली अपक्ष लढून 90 हजार मते मिळाली. आगामी निवडणुकीत स्वराज्याचा भगवा किती मार्जिनने आणायचा, याकडे लक्ष आहे. ना. हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता, घडलेल्या घडामोडी करेक्ट झाल्या आहेत. शाहू महाराजांची जन्मभूमी, कर्मभूमी करण्याकरिता साथ द्यावी. परिवर्तनाच्या कामाला कार्यकर्त्यांनी लागावे, असे आवाहनही त्यांनी केले. (political news)

राजेंद्र तारळे, शकीला शहाणेदिवान, शर्मिष्ठा कागलकर, माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, माजी जि.प. सदस्या अनिता चौगुले यांची भाषणे झाली. स्वागत व प्रास्ताविक भैया इंगळे यांनी केले, संजय पाटील यांनी आभार मानले.

घाटगे नेमकी कोणती भूमिका घेणार, याची उत्सुकता लागलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित होते. वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर लोकांचे लक्ष वेधून घेत होते. समरजितसिंह घाटगे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या जात होत्या.

यावेळी बाबासाहेब हिंदुराव पाटील, बाबगोंडा पाटील, संग्राम कुपेकर, राजे बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील, शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, सौ. नवोदिता घाटगे, सौ. श्रेयादेवी घाटगे, वीरेंद्रसिंह घाटगे उपस्थित होते.

ते मंत्री काय, मुख्यमंत्री होऊ देत!

घाटगे म्हणाले, मुंबईला जात असतानाच मंत्रिमंडळ विस्तार सुरू असल्याचे वाटेत कळाले. कॅबिनेट मंत्री म्हणून हसन मुश्रीफ यांचा समावेश झाल्याचे समजले. ते मंत्री काय, मुख्यमंत्री झाले तरी आमच्यात काय फरक पडत नाही. त्याची चिंता नाही. सत्ता नसताना देखील कार्यकर्ते माझ्या पाठीशी राहिले आहेत, हे महत्त्वाचे आहे.

आता रेकॉर्डब्रेक मार्जिनने जिंकणार

ही राजर्षी शाहू महाराजांची भूमी आहे. त्यांनी सर्व समाजाला न्याय दिला. त्या शाहू महाराजांचा वंशज म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला मी साद घालतोय. मला तुमची साथ हवीय. राजर्षींच्या जन्मभूमीत पुन्हा विकासाचे पर्व आणण्यासाठी मला साथ हवी आहे, असे आवाहन करून घाटगे म्हणाले, या मेळाव्याच्या आधी आपला ज्या मार्जिनने (मताधिक्य) विजय होणार होता, त्याच्या दुप्पट मार्जिनने आता आपला विजय निश्चित आहे. रेकॉर्डब्रेक मार्जिनने कागलचा कोंढाणा आता सर करायचा.

पुनर्वसन करा म्हणून सांगायला गेलो नव्हतो

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मला मेसेज आला होता. मुंबईत असाल तर भेटायला या, असा निरोप होता. दोन दिवसांनी त्यांना भेटायला गेलो. सव्वा तास त्यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. मी माझे पुनर्वसन करा म्हणून सांगायला गेलो नव्हतो. महामंडळ, आमदारकी सोडून द्या, जे काय बोलायचे ते मी त्यांच्याशी बोललेलो आहे, असे घाटगे यांनी स्पष्ट केले.

कार्यकर्त्यांचा जल्लोष

समरजित घाटगे यांचे भाषण सुरू असताना त्यांच्या भूमिकेची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती. ते कोणती भूमिका घेणार, याची उत्कंठा लागलेली असतानाच घाटगे यांनी भाषण सुरू असताना आपल्या खिशातील भारतीय जनता पक्षाचा स्कार्प काढून गळ्यात घातला आणि आपण भारतीय जनता पक्षातच असल्याचे दाखवून दिले. यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *