मंत्री मुश्रीफ आज कोल्हापुरात; जंगी स्वागत व कागलमध्ये जाहीर मेळावा
(minister) मंत्री हसन मुश्रीफ शुक्रवार (दि. 7) पासून चार दिवसांच्या कोल्हापूर जिल्हा दौर्यावर येत आहेत. राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर मुश्रीफ यांचे कोल्हापुरात आगमन होत असून, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची जंगी तयारी केली आहे. दुपारी 4 वाजता कागल येथील गैबी चौकात त्यांचा नागरी सत्कार व जाहीर मेळावा होणार आहे. यावेळी मुश्रीफ आपली भूमिका मांडणार आहेत, त्याकडेही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता त्यांचे ताराराणी चौकात आगमन होईल. ताराराणींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर, दसरा चौकात ते राजर्षी शाहूंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर शाहू समाधिस्थळावर जाऊन ते अभिवादन करणार आहेत. यानंतर ते शिवाजी चौकात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार आहेत. दुपारी साडेबारा वाजता ते अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत. यानंतर दुपारी चार वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृहावर थांबणार आहेत. त्यानंतर ते कागलला रवाना होणार आहेत. ताराराणी चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे.
कागलच्या गैबी चौकात (minister) मुश्रीफ यांचा भव्य नागरी सत्कार व जाहीर मेळावा होणार आहे. मंत्रिपदाच्या शपथविधीनंतर ते प्रथमच कागलमध्ये येत आहेत. त्यांचे अभूतपूर्व व जल्लोषी स्वागत करूया, असा निर्धार कागल येथील कार्यकर्त्यांनी केला आहे.