जनावरांसाठी वैरण लावा आणि सरकारी योजनेचा लाभ मिळवा
काही वर्षांपूर्वी पशुधन किंवा पशु संबंधित व्यवसायाकडे जोडधंदा म्हणून बघितले जात होते. मात्र या क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे हा एक मुख्य व्यवसाय होऊ पाहतो आहे. त्यामुळे शहरात किंवा इतरत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना, पशुपालकांना, वर्षभर हिरवा चारा उपलब्ध व्हावा आणि दुभत्या जनावरांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने पशुसंवर्धन विभागातर्फे राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत वैरण आणि खाद्य अभियान राबविले जात आहे. त्यामुळे पशुपालकांसह (farmer) शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
काय आहे योजना?
केंद्र शासनाच्या वतीने देशभर पशुसंवर्धन विभागामार्फत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत वैरण आणि खाद्य उद्योजिका विकास अभियान राबविले जाते आहे. वनक्षेत्र नसलेल्या नापीक, गायरान, गवती कुरणक्षेत्र आणि पडीक जमिनीवर वैरण उत्पादनासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जात आहे. हिरव्या चाऱ्याची वर्षभर मोठ्या प्रमाणावर मागणी असून या क्षेत्रात एक उत्तम उद्योग म्हणून नवी संधी उपलब्ध झाली आहे. हिरव्या चाऱ्याची उपलब्धता आणि पूर्तता झाल्यास दुग्ध व्यवसायासह पशूंच्या आरोग्याला देखील फायदा होईल, असे नागपूर पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त नितीन फुके यांनी सांगितले.
किती आहे अनुदान?
वनक्षेत्र नसलेल्या नापीक, गायरान, गवती कुरणक्षेत्र आणि पडीक जमिनीवर वैरण उत्पादनासाठी शेतकऱ्यांना वर्षाला 2000 ते 2400 टन उत्पादन करण्याकरिता 50 लाखाचे एक युनिट आहे. त्यात 50 टक्के अनुदान या स्वरूपात दिले जात आहे. या मध्ये हिरव्या चाऱ्याचे सायलेज मेकिंग युनिट, तसेच चाऱ्याचे ब्लॉक तयार करून गरजेनुसार वर्षभर हिरव्या चाऱ्याची पूर्तत्ता करणे हे शासनाने धोरण आहे, असे फुके सांगतात.
काय आहेत उद्दिष्ट्ये?
पशुपालकांना असणारी वैरण टंचाई लक्षात घेता वैरण व पशुखाद्य यामध्ये उद्योजकता विकास करणे आणि मागणी व पुरवठ्यातील अंतर कमी करण्यासाठी वैरण प्रक्रिया युनिटची स्थापना करण्यास प्रोत्साहन देणे. वैरण व पशुखाद्य तंत्रज्ञानाचा प्रथमदर्शनी प्रात्यक्षिकाद्वारे प्रचार व विकास करणे. स्थानिक पातळीवर किफायतशीर किमतीवर वैरण उपलब्ध करून देणे. गुणवत्तापूर्ण वैरण बियाणे उत्पादनाकरिता अनुदानावर उपलब्ध करणे. अधिक उत्पादन देणाच्या प्रजाती संशोधनाला प्रोत्साहन देणे. उच्च जातीचे बियाणे उपलब्ध करणे, अशा बाबींचा सर्व समावेशक उपक्रम या योजनेतून राबविण्यात येत आहे, असेही फुके यांनी सांगितले.
बेरोजगारांना संधी
काही वर्षांपूर्वी पशुपालन किंवा त्यासोबत संलग्न व्यवसाय हे जोडधंदा म्हणून शेतकरी करत होता. मात्र अलीकडच्या काळात पशुपालन हा एक स्वतंत्र व्यवसाय झाला आहे. त्यामुळे शहरी भागात हिरव्या चाऱ्याची कमतरता भासत असते. परिणामी त्याचा दुग्ध उत्पादनावर व इतर घटकांवर परिणाम होतो. या राष्ट्रीय पशुधन विकास अभियाना अंतर्गत दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. (farmer) शेतकरी पशुपालकांसह बेरोजगारानी देखील या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन फुके यांनी केले आहे.
येथे करा अर्ज
राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत वैरण आणि खाद्य उद्योजिका विकास योजना अंतर्गत या योजनासाठी शेतकऱ्यांनी nlm.udyamimitra.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावा. त्यामध्ये मागितलेली माहिती दस्तावेज हे भरून या योजनेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाकचे उपायुक्त नितीन फुके यांनी केले आहे.