कोल्हापूर : 300 महिला बचत गटांच्या माध्यमातून मिरची उत्पादन

जिल्ह्यात मिरची (chilli) पिकाचे उत्पादन हे कमी क्षेत्रावर घेतले जाते; पण सध्या मिरचीला बाजारात असलेली मागणी आणि मिळणारे उत्पन्न याचा विचार होऊन बचत गटांच्या माध्यातून मिरची उत्पादन घेतले जात आहे. जिल्ह्यातील करवीर आणि पन्हाळा या दोन तालुक्यांतील 300 महिला बचत गटांच्या 700 पेक्षा अधिक महिला यासाठी काम करत आहेत. 25 टनांपेक्षा अधिक उत्पादन या बचत गटांकडून अपेक्षित आहे.

जिल्ह्यात गडहिंग्लज आणि चंदगड तालुक्यांतील काही भागात खरीप हंगामात तर शिरोळ आणि हातकणंगले या तालुक्यात खरीप आणि रब्बी हंगामात मिरचीचे उत्पादन घेतले जाते. नगदी पीक असतानाही मिरची उत्पादनाकडे शेतकर्‍यांचा ओढा कमी आहे. यामुळे जिल्ह्याला जेवढ्या मिरचीची गरज आहे, त्याची पूर्तता होत नाही. यासाठी जिल्ह्यात मिरचीचे उत्पादन वाढवणे आणि मिरचीपासून निर्यातक्षम उत्पादन करण्यासाठी कृषी पणन मंडळाच्या मॅग्नेट योजनेंतर्गत मिरची पिकाचा समावेश करून त्यासाठी अनुदान देण्याची शासन योजना आहे.

यासंदर्भात मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील 750 पेक्षा अधिक महिलांना शास्त्रोक्त पद्धतीने मिरची (chilli) उत्पादन कसे घ्यावयाचे, छाटणी कशी करावयाची, वाळवणे आणि ती टिकवणे या मुद्द्यावर प्रशिक्षण देण्यात आले. मिरचीपासून तिखट चटणी, लोणचे करणे, ओल्या मिरचीची सुखी पावडर तयार करणे याबाबत लागणार्‍या मशिनरीची माहिती देण्यात आली. एक हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर मिरची लागण झाल्यास त्यास अनुदान मिळू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *