एक रुपयात पीक विमा; अर्ज भरण्यासाठी शंभर-दोनशे रुपये!
एक रुपया पीक विमा योजनेत (scheme) शेतकर्यांची लूट होत आहे. या योजनेचा अर्ज भरण्यासाठी विमा कंपनीकडून केंद्र चालकांना रक्कम दिली जाते, तरीही शेतकर्यांकडून सीएससी केंद्र चालक रक्कम आकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत. विमा एक रुपयाचा आणि अर्ज भरण्यासाठी शंभर-दोनशे रुपये असा प्रकार अनेक ठिकाणी सुरू आहे. याबाबत शेतकर्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
राज्यात 2023-24 पासून “सर्वसमावेशक पीक विमा योजना राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकर्यांना केवळ एक रुपया भरून स्वत: तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामूहिक सेवा केंद्र यांच्या मार्फत योजनेसाठी नोंदणी करता येते.
जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 ते रब्बी 2025-26 या हंगामाकरिता तीन वर्षांसाठी निश्चित केलेल्या शेतातील, निश्चित केलेल्या पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून शेतकर्याला केवळ एक रुपया भरून या योजनेत (scheme) सहभागी होता येणार आहे. या योजनेसाठी सीएससीवर (सामूहिक सेवा केंद्र) अर्ज भरून घेणार्यांची संख्या अधिक आहे. सीएससीवर अर्ज भरल्याबद्दल संबंधित केंद्र चालकांना विमा कंपनीकडून प्रति अर्ज 40 रुपये देण्यात येतात. तरीही काही केंद्रावर शेतकर्यांकडून अर्ज भरण्यासाठी शंभर-दोनशे रुपयांपर्यंतची रक्कम आकारली जात आहे.
शेतकर्यांनी संपर्क साधावा : कृषी विभाग
जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात अशा प्रकारच्या तक्रारी वाढत चालल्याचे कृषी विभागानेच स्पष्ट केले आहे. पीक विमा योजनेचा अर्ज भरण्यासाठी शेतकर्यांकडून अतिरिक्त रकमेची मागणी केल्यास केल्यास शेतकर्यांनी संबंधित पीक विमा योजनेचे कार्यालय, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.