“बेकायदा दानपात्रांची ‘ईडी’ चौकशी करा”
बेकायदा दानपात्रांची ‘ईडी’ चौकशी झालीच पाहिजे, आजपर्यंत मिळालेले दान वसूल झालेच पाहिजे, संबंधितांवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, अशा मागण्या करत बेकायदा दानपात्रांच्या (donations) विरोधात संभाजी बि—गेडच्या वतीने सोमवारी आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या परवानगी शिवाय काही लोकांनी करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात बेकायदेशीर दानपात्रे ठेवली आहेत. दरमहा सुमारे 5 लाख म्हणजेच वर्षभरात 60 लाखांच्या घरात या दानपात्रांमध्ये दान जमा होते. हा निधी देवस्थान समितीच्या माध्यमातून मंदिर परिसर विकासावर खर्च होणे गरजेचे आहे. मात्र, हे दान दानपात्र बसवणार्यांकडे जमा होते. मंदिरात देवस्थान समितीने बसविलेल्या दानपेट्या असताना या दानपेट्यांशेजारी दानपात्र म्हणून बुट्ट्या ठेवल्या असून, ते बसविणारे लोक भाविकांना या बुट्ट्यांमध्येच दान टाकायला लावतात. हा प्रकार तातडीने बंद व्हावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. कोणतीही परवानगी न घेता मंदिरात कोणीही दानपात्र लावू शकतो.
ताराबाईरोडवर जोरदार घोषणाबाजी करत भगवे ध्वज व मागण्यांचे फलक घेऊन आंदोलनकर्त्यांनी मंदिरात दानपात्र (donations) बसविण्याचा प्रयत्न केला. पोलिस व देवस्थानच्या सुरक्षा रक्षकांनी आंदोलनकर्त्यांना रोखून ताब्यात घेतले. आंदोलनात जिल्हाध्यक्ष नीलेश सुतार, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा चारुशीला पाटील, संतोष खोत, संतोष महासळणकर, शर्वरी माणगावे, माया भुयेकर, आसिफ स्वार आदींनी सहभाग घेतला.