जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात महिला अत्याचाराची ‘ही’ आकडेवारी चिंताजनक
जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात महिलांच्या विनयभंगाचे 404 गुन्हे, तर बलात्काराचे 77 गुन्हे (crime) पोलिसांत दाखल आहेत. याच कालावधीत जिल्ह्यातील 18 महिलांचे खून झाले असून 12 जणींच्या खुनाचा प्रयत्न झाला. महिला अत्याचाराची ही आकडेवारी चिंताजनक आहे.
शाळा-महाविद्यालयांपासून कामाच्या ठिकाणी तसेच अन्य ठिकाणी छेडछाडीच्या घटना घडतात. मात्र, अनेकदा घाबरून महिला तक्रारीसाठी पुढे येत नाहीत. अनेकजणी त्याकडे दुर्लक्ष करतात. पोलिसांत तक्रारीकडे अनेकदा गांभीर्याने पाहिले जात नाही. जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात छेडछाडीचे केवळ 16 गुन्हे दाखल आहेत.
अशीच काहीशी परिस्थिती विनयभंग प्रकरणात आहे. अनेकदा महिला घाबरून समोर येत नाहीत, आल्या तरी त्यांना म्हणावे तसे पाठबळ मिळत नाही. अनेकदा तर विनयभंग झाला आहे, हेच त्यांना समजत नाही. जिल्ह्यात दीड वर्षात विनयभंगाचे 404 गुन्हे दाखले झाले आहेत. त्यापैकी 399 गुन्हे उघडकीस आले आहेत.
जिल्ह्यात शारीरिक छळाच्या तक्रारी सर्रास असतात. मात्र, समुपदेशन, मध्यस्थांमुळे अनेक तक्रारी दाखलच होत नाहीत. जिल्ह्यात छळाच्या 327 तक्रारी दीड वर्षाच्या कालावधीत दाखल आहेत. हुंडाबळीच्या दोन तक्रारी तर शारीरिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या 6 तक्रारी आहेत. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे अन्य 18 गुन्हे (crime) दाखल आहेत.
निर्भया पथकाच्या दीड वर्षात 11 हजार कारवाया
दीड वर्षात जिल्ह्यात निर्भया पथकाने मुंबई पोलिस कायदा कलम 110, 117 नुसार 6 हजार 487, तर मोटार वाहन कायद्यानुसार 4 हजार 957 कारवाया केल्या आहेत. 7 हजार 44 जणांचे पथकाने समुपदेशन केले आहे.