जिल्ह्यात ‘पीसीआरएस अॅप’ चाचणी स्वरूपात कार्यरत
सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्ड्यांसंदर्भात पीसीआरएस हे नवीन अॅप (app) विकसित केले असून या अॅपच्या माध्यमातून नागरिकांना थेट खड्ड्यांच्या फोटोसह तक्रार करू शकतात. सध्या हे अॅप चाचणी स्वरूपात कार्यरत आहे. या अॅपवर कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे एक हजारावर तक्रारी आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्यातील अभियंत्यांनीच या तक्रारी करून चाचणी सुरू केली आहे.
राज्यातील बहुतांश रस्त्यांवर खड्ड्यांंचे साम—ाज्य असल्याने राज्यभरातून नागरिकांच्या तक्रारी आहेत. या तक्रारींतून रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दर्जेदार रस्ते असावेत आणि रस्त्यात खड्डे असल्यास नागरिकांना थेट मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे तक्रार करता यावी, यासाठी पॉटहोल कम्प्लेट रिट्रलर सिस्टीम (पीसीआरएस) या नावाने अॅप विकसित केले आहे. या अॅपमध्ये नागरिकांना थेट सहभागी करून घेतले आहे. अँड्रॉईड मोबाईलमध्ये हे अॅप डाऊनलोड करता येते.
अॅपमध्ये (app) संबंधित रस्त्यातील खड्ड्याचा फोटो काढून थेट अॅपवर पाठवता येतो. या अॅपमध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आणि शाखा अभियंता या सर्वांचा समावेश आहे. नागरिकाने फोटो पाठवल्यास हा फोटो थेट मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव व मंत्र्यांकडे जातो. तेथून हा फोटो संबंधित भागातील शाखा अभियंता, उपअभियंता यांना पाठवला जातो. या दोन्ही अभियंत्यांनी आठ दिवसांत या तक्रारींचे निरासन करून संबंधित नागरिकांसह अॅपवर खड्डा मुजविल्याचा फोटो पाठविण्याचे बंधन आहे.
राज्यातील सर्व रस्ते गुगलद्वारे अॅपवर घेण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकाने फोटो काढल्यास गुगल मॅपसह फोटो अपलोड होऊन खड्ड्याचे ठिकाण तत्काळ कळते. सध्या हे अॅप चाचणी स्वरूपात सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाखा अभियंता उपअभियंत्यांनी चाचणीसाठी फोटो पाठवून तक्रारी नोेंदवल्या आहेत. अशा सुमारे एक हजारावर तक्रारी सध्या जिल्ह्यातून प्राप्त झाल्याचे सांगण्यात येते. यामध्ये काही नागरिकांच्याही तक्रारी आहेत.
हा रस्ता आमच्या हद्दीत नाही
नागरिकांच्या बहुतांश तक्रारी नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या मालकीच्या रस्त्यांबाबत असल्याने हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येत नाही, असा निरोप संबंधित नागरिकांस देऊन तक्रारींचे निरासन केले आहे.