९ तालुक्यात भूस्खलनाचा धोका, कोल्हापूरकरांच्या झोपा उडाल्या

पश्चिम महाराष्ट्र आणि या भागातील घाटात गेल्या दहा वर्षांत भूस्खलनाचे (landslides) प्रमाण सतत वाढत आहे. या दशकात केवळ कोयना धरण परिसरातच तब्बल १,८२३ भूस्खलनाच्या नोंदी झाल्या आहेत. २०२१ साली एका वर्षात तब्बल १२३ ठिकाणी ही आपत्ती ओढावली. यावर कायमचा तोडगा काढला जात नाही. दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात येतात. त्या पलीकडे काहीच होत नसल्याने ही गावे भीतीच्या छायेखाली राहात आहेत.

इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर भूस्खलनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी माळीणगाव दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने एक सर्वेक्षण केले. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ७६ गावांना भूस्खलनाचा धोका असल्याचा अहवाल देण्यात आला. पण, पश्चिम महाराष्ट्र आणि घाटात हा धोका गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शिवाजी विद्यापीठातील भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. अभिजीत पाटील यांनी याचा अभ्यास केला. त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार कोयना परिसरात तब्बल १,८२३ ठिकाणी भूस्खलन झाल्याच्या नोंदी आहेत. २०१९ पासून हे प्रमाण सतत वाढत आहे.

गेल्या चार वर्षात जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूस्खलन (landslides) झाले. काही रस्ते बंद झाले. बहुतांशी गावे डोंगराच्या पायथ्याशी आहेत. गावाच्या वेशीवर ते झाले नसले, तरी अनेक शेतापर्यंत धोका पोहोचला आहे. यामुळे रात्री अनेकांना झोप लागत नाही.

कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या बारा पैकी नऊ तालुक्यात भूस्खलनाचा धोका आहे. काही वर्षात जिल्ह्यात अनेकदा महापुराने तडाखा दिला. ग्रामीण भागात यामुळे मोठे नुकसान झाले. सतत दरड कोसळणे, जमीन खचणे, रस्ते खचणे असे प्रकार घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर भूस्खलनाचा धोका वाढत आहे. इर्शाळवाडी येथे घडलेल्या घटनेने आता जिल्ह्यातील प्रशासन सतर्क झाले आहे. काही गावांना दरड प्रवण क्षेत्र घोषित करण्यात आले. धोकादायक गावांना रोज भेटी देऊन पाहणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या आहेत.

चार वर्षात कमी काळात होणारी अतिवृष्टी, वृक्षतोड व इतर अनेक कारणामुळे पश्चिम घाटात भूस्खलनाचे प्रमाण वाढले आहे. २०२१ या वर्षात १२३ ठिकाणी नोंदी झाल्या आहेत. आता याकडे दुर्लक्ष न करता हा धोका गांभीर्याने घेण्याची गरज आहे – डॉ. अभिजीत पाटील, शिवाजी विद्यापीठ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *