कोल्हापूर : 80 बंधारे पाण्याखाली; 55 मार्ग बंद
पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ सुरूच आहे. रविवारी पाण्याखाली गेलेल्या बंधार्यांची संख्या 80 वर गेली. कोल्हापूर-गगनबावडा-वैभववाडी या राष्ट्रीय महामार्गासह 55 मार्गांवर पाणी आल्याने त्यावरील वाहतूक (Transportation) बंद आहे. यामुळे जिल्ह्यातील 200 हून अधिक गावांचा एकमेकांशी असणारा थेट संपर्क तुटलेला असून पर्यायी मार्गांनी सुरू असलेल्या वाहतुकीचा नागरिकांना फटका बसत आहे.
पंचगंगेवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावतीवरील शिरगाव, तारळे, हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे, कासारीवरील यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, वालोली, बाजारभोगाव, पेंडाखळे, करंजफेण व कुंभेवाडी, हिरण्यकेशीवरील साळगाव, सुळेरान, चांदेवाडी, दाभीळ, ऐनापूर व निलजी, घटप्रभेवरील पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगाव, कानर्डे-सावर्डे, अडकूर, कानडेवाडी व तारेवाडी, वेदगंगेवरील निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, सुरुपली, चिखली, गारगोटी, म्हसवे व शेणगाव सुक्याचीवाडी, कुंभीवरील कळे, शेनवडे, वेतवडे, मांडुकली, सांगशी व असळज, वारणेवरील चिंचोली, माणगाव, तांदूळवाडी, कोडोली, शिगाव व खोची, कडवीवरील भोसलेवाडी, कोपार्डे, शिरगाव, सवते सावर्डे व सरुड पाटणे, धामणीवरील सुळे, पनोरे, आंबर्डे, गवशी व म्हासुर्ली, तुळशी नदीवरील- बीड, आरे व बाचणी, ताम्रपर्णीवरील कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, काकरे, न्हावेली व कोवाड, दूधगंगेवरील दत्तवाड, सुळकूड व सिद्धनेर्ली आदी बंधारे पाण्याखाली आहेत. यामुळे या बंधार्यांवरून होणारी वाहतूक बंद आहे. अनेक ठिकाणी पर्यायी मार्गांनी वाहतूक सुरू आहे.
कोल्हापूर-गगनबाबडा मार्गावर मांडुकली आणि लोंघे जवळ पाणी आल्याने हा मार्ग बंद आहे. या राष्ट्रीय महामार्गासह सार्वजनिक बांधकाम विभागाकडील 8 राज्य मार्गांवर पाणी आल्याने त्यावरील वाहतूक (Transportation) बंद आहे. जिल्ह्यातील 17 प्रमुख जिल्हा मार्गही पाणी आल्याने बंद आहेत.
तावडे हॉटेल परिसरातील 100 नागरिकांचे स्थलांतर
अधूनमधून उघडीप देत शहरात रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे नदीसह ओढे, नाले देखील तुुडुंब भरून वाहत आहेत. पंचगंगा नदीचे पाणी इशारा पातळीच्या दिशेने वाहू लागल्याने महापालिका प्रशासन अलर्ट झाले आहे. महापालिकेने तावडे हॉटेल परिसरातील 100 नागरिकांना स्थलांतरित केले आहे. सुतारवाड्यात अद्याप पाणी शिरले नसले, तरी चित्रदुर्ग मठात त्यांची व्यवस्था प्रशासनाने केली असून तेथे स्थलांतरित होण्याबाबत नागरिकांना सांगितले आहे.
रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अनेकांनी पंचगंगा नदीवर पुराचे पाणी पाहण्यासाठी गर्दी केली. रविवार हा बाजाराचा दिवस असल्याने बाजारात प्लास्टिक कागदाचा आधार देत विक्रेत्यांनी भाजीपाला-फळासह विविध स्टॉल सज्ज ठेवले होते. पाऊस असला तरीदेखील बाजारासाठी मात्र नागरिकांनी गर्दी केली होती. पुराचे पाणी इशारा पातळीच्या दिशेने वाहू लागल्याने संभाव्य पाणी येण्याच्या ठिकाणांबाबत महापालिकेने यादी प्रसिद्ध केली आहे. नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पाणी पातळी झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.