बेडग पंचक्रोशीत कडकडीत बंद; बाजारपेठ ठप्प
बेडग (ता. मिरज) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वागत कमान पाडून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी बेडगचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह इतरांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसाठी बेडगमध्ये बेमुदत कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. तसेच या मागणीला एरंडोली, पायपाचीवाडी आणि बेडगमधील ग्रामस्थांनी समर्थन देऊन बंद पाळला.
रविवारचा आठवडा बाजार भरला नाही. कर्नाटकमधील मंगसुळीसह आरग, लक्ष्मीवाडी, शिंदेवाडी, मल्लेवाडी, नरवाड, म्हैसाळ, डोंगरवाडी, कदमवाडी, लिंगनूर, खटाव, मानमोडी, कानडवाडी, खंडेराजुरी आदी गावांनी सोमवारी बंद ठेवून होणार्या मोर्चास पाठिंबा दिला आहे. तर एरंडोली, पायप्पाचीवाडी, शिपूर या गावांनी रविवारी गाव बंद ठेवून पाठिंबा दिला . जिल्ह्यातील अनेक गावांचा पाठिंबा मिळत आहे. बेडगमधील अनेक ग्रामस्थांनी मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आजपासून अनेक विद्यार्थी निर्णय लागत नाही तोपर्यंत शाळेत जाणार नाहीत. जोपर्यंत सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांवरील गुन्हे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत गाव बेमुदत बंद ठेवण्याचा ग्रामस्थांनी निर्णय घेतला आहे.
पंचक्रोशीतील गावांचे समर्थन
सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांवरील अॅट्रॉसिटीचा गुन्हा (crime) मागे घेण्यासाठी बेडगच्या आसपास गावातील ग्रामस्थांनी सहभाग घेतला आहे. रविवारी एरंडोली, पायपाचीवाडी आणि शिपूर गावातील ग्रामस्थांनी बंद पाळून बेडगमधील ग्रामस्थांना समर्थन दिले. सोमवारपासून पंचक्रोशीत आणखीन काही गावांत बंद पाळण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा
बेडगमधील सरपंच, उपसरपंच यांच्यासह इतरांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत. गावाची बदनामी करणार्यास तत्काळ अटक करावे. उपविभागीय अधिकारी यांच्याकडून फक्त बेडगकरांना अतिक्रमणाबाबत देण्यात आलेल्या नोटिसांच्या विरोधात हा मोर्चा असणार आहे. मोर्चास सोमवारी सकाळी 9 वाजता सुरुवात होणार आहे. आंदोलक चालत सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहचणार आहेत.
पोलिस बंदोबस्त
अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गावात तणाव आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. गावातील सर्व राजकीय नेत्यांवर तसेच दोन्ही गटातील कार्यकर्त्यांवर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे.