मुख्यमंत्री बदलाबाबत देवेंद्र फडणवीस यांचा मोठा खुलासा

(political news) महायुतीतील सर्वांत मोठ्या पक्षाचा नेता म्हणून मी अतिशय अधिकृतपणे सांगतो की, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील. दुसरे कोणीही मुख्यमंत्री होणार नाही. मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही बदल होणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

फडणवीस म्हणाले, यासंदर्भात अजित पवार आणि मी आमच्या दोघांच्या मनात पूर्ण स्पष्टता आहे. महायुतीची चर्चा झाली त्यावेळेसही अजित पवार यांना याबाबतची स्पष्टपणे कल्पना देण्यात आली आहे. ती त्यांनी स्वीकारली आहे. मुख्यमंत्री बदलाची कोणतीही चर्चा नाही, हे त्यांनी स्वत:देखील स्पष्ट केलेले आहे.

एकनाथ शिंदे यांच्याऐवजी अन्य कोणी मुख्यमंत्री होणार असा संभ्रम निर्माण करणाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो तो की, त्यांनी ते तत्काळ बंद करावे. त्यांच्या विधानांनी युतीत कुठलाही गोंधळ निर्माण होणार नाही. कार्यकर्त्यांनीही संभ्रमात राहू नये, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

कुठल्याही पक्षातील लोकांना असे वाटते की, त्यांच्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री झाले पाहिजेत. यात वावगे काहीही नाही. राष्ट्रवादीवाल्यांना वाटू शकते की अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत. आमच्या पक्षातील लोकांना वाटू शकते की भाजपला मुख्यमंत्रिपद मिळावे. मात्र, मी अतिशय अधिकृतपणे सांगतो की, एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील.
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा दावा

राष्ट्रवादीचे दोन मंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि अनिल पाटील यांनी मात्र अजित पवार मुख्यमंत्री होतील, असा दावा केला. अजितदादा लवकरच मुख्यमंत्री होतील असे वाटते, पण सध्याचे सरकारही उत्तम काम करत आहे, असे आत्राम म्हणाले.

अनिल पाटील म्हणाले की, अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत ही माझीच नाही, गल्लीपासून दिल्लीश्वरांची इच्छा आहे. दिल्लीतील कोणत्या नेत्यांची तशी इच्छा आहे हे मी सांगण्याची गरज नाही. (political news)

विस्ताराचे स्पष्ट संकेत फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री बदलणार असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण बोलले. अशा प्रकारची पतंगबाजी सध्या अनेक लोक करत आहेत.

अनेक जण भविष्यवेत्ते झाले आहेत. त्यांनी असे कितीही भविष्य सांगून १०, ११ तारखेला नक्कीच काही होणार, असे सांगितले असले तरी त्यात काहीही अर्थ नाही.

मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही बदल होणार नाही. झालाच तर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. त्याची तारीख ठरायची आहे. मुख्यमंत्री शिंदे ठरवतील तेव्हा विस्तार होईल, असेही फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *