शरद पवारांना सोलापूरमध्ये मोठा धक्का!
(political news) राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी काही आमदारांसह राष्ट्रवादीतून बंडखोरी केल्यामुळे पक्षात उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. पक्षातील आणखी काही आमदार आणि पदाधिकारी अजित पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. पक्षात फुट पडल्यानंतर एकीकडे शरद पवार नव्याने पक्षबांधणी करत आहेत, तर दुसरीकडे सोलापूरमध्ये त्यांना मोठा धक्का बसला आहे.
राष्ट्रवादी फुटल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील काही घरेदेखील फुटली आहेत. त्याचाच प्रत्यय काल (मंगळवारी) पुन्हा आला. शरद पवार गटाचे खंदे समर्थक आणि सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांचे घरदेखील फुटल्याचे मानले जात आहे. बळिराम साठे यांचे सुपुत्र जितेंद्र साठे आणि नातू जयदीप साठे हे अजित पवार यांच्या गटात सामील झाले आहेत. या संबंधितांनी मंगळवारी (ता.२५) मुंबईत अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सुनील तटकरे उपस्थित होते.
मोहोळचे आमदार आणि अजित पवार यांचे कट्टर समर्थक यशवंत माने यांनी याप्रकरणी मध्यस्थी केली आहे. विशेषत्वे, या घटनेने बळिराम साठे यांना धक्का बसल्याच्या चर्चेचे मोहोळ उत्तर सोलापूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात उठले आहे. शिवाय सुरवातीला सुपुत्र आणि नातू यांना अजित पवार गटाकडे पाठवायचे त्यानंतर आपण स्वत:हून याच गटात सामील व्हायचे अशी खेळी खुद्द बळिराम साठे यांचीच असल्याच्या चर्चेचे वादळदेखील आता उठले आहे. बळिराम साठे यांनीच सुपुत्र आणि नातू यांना अजित पवारांकडे पाठविल्याचा सर्वत्र बोलबाला आहे.(political news)
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे कट्टर समर्थक व सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांचे चिरंजीव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे व नातू जयदीप साठे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. त्यातून नव्या चर्चांना आता तोंड फुटले आहे.
बळिराम साठे हे यापूर्वी माजी आमदार राजन पाटील यांच्या समवेत भाजपत जाण्याच्या बेतात होते. मात्र, पुढे राजन पाटील यांचाच प्रवेश लांबल्याने बळिराम साठे हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राहिले. अजित पवार यांचा गट फुटल्यानंतर शरद पवार यांच्या गटासमवेत राहण्यातच बळिराम साठे यांनी धन्यता मानली होती.
दरम्यान, राजन पाटील व आमदार यशवंत माने यांनी बळिराम साठे यांचे मन वळवून आपण त्यांना अजित पवार गटात आणू असे सांगितले होते. मात्र, अद्याप बळिराम साठे हे शरद पवार गटासोबतच असतानाच, घरातूनच त्यांना धक्का बसला आहे. नातू आणि मुलाने अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी ही भेट घडवून आणली. यावेळी बळिराम साठे यांचे कट्टर समर्थक हरिभाऊ घाडगे उपस्थित होते.
जितेंद्र साठे म्हणाले, अजितदादांनी ‘हे’ दिले आश्वासन
उत्तर तालुक्यातील शिरापूर उपसा सिंचन, वडाळा येथे तालुकास्तरीय क्रीडा संकुल, ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा हे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिल्याचे जितेंद्र साठे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. तसेच अजित पवार गटासाठी तालुक्यात वरिष्ठांच्या आदेशानुसार संघटनही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मतदारसंघाचे आमदार यशवंत माने व माजी आमदार राजन पाटील यांनी अजित पवारांना या अगोदरच पाठिंबा दिला आहे. आता उत्तर सोलापूरमधील विविध प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे असेही साठे म्हणाले.
काही ठळक नोंदी
सुपुत्र आणि नातू यांच्या अजित पवार गोटात सामील होण्यावर बळिराम साठेंचे मौन
अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्याशी ‘उत्तर’च्या प्रश्नांवर केली चर्चा
साठे पिता-पुत्राच्या अजित पवार भेटीने उत्तर तालुक्यात राजकीय क्षेत्रात खळबळ