“आम्ही खंजीर खुपसला? मग राष्ट्रवादीने काय खुपसलं?”

(political news) शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणता, मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं? तुम्ही राष्ट्रवादी का फोडलीत? राज्यात तुमचं सरकार होतं ना. शिवसेना फोडून आणि अपक्षांना सोबत घेऊन तुम्ही मजबूत सरकार स्थापन केलं होतं ना. मग तरीही राष्ट्रवादी का फोडलीत?, असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. तसेच, राष्ट्रवादी फोडण्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर घोटाळ्याचे भयंकर आरोप केले होते. त्या आरोपांचं काय झालं? त्या घोटाळ्यांच्या पैशांचं काय झालं?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दैनिक ‘सामना’साठी मुलाखत घेतली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपली रोखठोक मते मांडताना भाजपला कोंडीत पकडणारे सवालच केले. राष्ट्रवादीसोबत जाणं ही भाजपची कूटनीती आहे की मेतकूट नीती आहे हे मला माहीत नाही. पण या कूटनीतीला आता ककुटून टाकण्याची वेळ आली आहे. नरक्षभक असतात तसे हे सत्ताभक्षक आहेत. सत्तालोलूपता सत्ताधाऱ्यांमध्ये आली आहे.त्यांना माणसं दिसेनाशी झाली आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

आधीपासूनच मेतकूट होतं

राष्ट्रवादी आणि त्यांच्यात आधीपासूनच मेतकूट होते. त्यांच्यात आधीपासून जे चाललं होतं त्याचा हा परिपाक आहे. आमच्यासोबत आले तर भ्रष्ट आणि त्यांच्यासोबत गेले की संत अशी ही नीती आहे, असं ते म्हणाले.

तो काय डालड्याचा डबा आहे काय?

राज्यात डबल इंजिनचं सरकार आहे. ते वेगवान सरकार आहे काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी चिमटा काढला. तुम्ही या सरकारला डबल इंजिन म्हणताय. मग तिसरं लागलं ते काय आहे? ते इंजिन नाहीये का? की डालड्याचा डबा आहे. मध्ये डबेच नाहीयेत, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

निवडणुका होतील की नाही भीती

केंद्र सरकारला निवडणुका घेण्याची इच्छाच राहिलेली नाही. 2024मध्ये हे सरकार परत आलं तर देशाच्या आयुष्याला एक वेगळं वळण लागेल. हे सरकार आलं तर देशात लोकशाही जिवंत राहील आणि पुन्हा निवडणुका होतील, असं वाटत नाहीये, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. केंद्रातील सरकार निवडणुका आल्या की एनडीएचं होतं. निवडणुका झाल्या की मोदींचं होतं, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीतील मुद्दे जसेच्या तसे…

काही वेळा आपली फसगत होते. ज्यांना आपण आपलं मानतो ती बांडगुळं निघतात. तरीदेखील ती आपल्यासोबत आहेत असं आपल्याला वाटत राहतं, पण प्रत्यक्षात ती त्या फांदीवरती मूळ वृक्षाचा रस शोषत असतात. वृक्षाला वाटतं, हे आपल्याच सोबत आहेत. (political news)

निवडणूक आयोगाचं काम हे निवडणूक निशाणी किंवा चिन्ह देण्याचं आहे. पक्षाचं नाव देण्याचं किंवा पक्षाचं नाव बदलण्याचं नाही. म्हणून आता जो विचित्र निकाल निवडणूक आयोगाने दिलेला आहे. त्याविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात गेलोय आणि मला खात्री आहे की, ज्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडताना ज्या गोष्टींची पूर्तता करण्याची आवश्यकता होती, त्या सर्व गोष्टींची पूर्तता आपण केली आहे. आणि ती पूर्तता केल्यामुळेच मला खात्री आहे की, ‘शिवसेना’ हे नाव आपल्याला पुन्हा मिळेल.

जी मनानेच विकली गेली आहेत ती माणसं मला नकोच आहेत. जी माझ्या सभोवती अगदी मूठभर का असतील, पण निष्ठावान असतील अशीच माणसं मला हवीत. कारण तीच खरी शक्ती असते. पसाभर गद्दार घेऊन फिरण्यापेक्षा मूठभर निष्ठावंत मला नेहमीच आवडतात.

शिवसेना मजबूत होतीच, पण आता अडीच वर्षांत मी जे काही करू शकलो त्याच्यामुळे महाराष्ट्रातली जनता मला त्यांच्या कुटुंबातील सदस्य मानायला लागली. ही माझी कमाई आहे. मोठी कमाई आहे.

त्या एका नात्याने शिवसेनेसोबत पूर्वी कधीही नव्हते असे लोकही, अशी जनताही शिवसेनेसोबत जोडली गेली. लोकं म्हणताहेत की, जे तुमच्यासोबत घडलं ते अयोग्य आहे. ही संस्कृती, हा संस्कार महाराष्ट्राचा नाही. तुम्ही काळजी करू नका. आम्ही सोबत आहोत. म्हणजे मला लोकांना काही सांगावंच लागत नाहीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *