कोल्हापूर : प्रस्ताव 10 कोटींचा… निधी 1 कोटीच!

ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग मैदानाच्या संवर्धन व सुशोभीकरणासाठी महापालिकेने 10 कोटींचा प्रस्ताव करून राज्य शासनाला पाठवला. मात्र, त्यापैकी फक्त 1 कोटीचा निधी (funding) मंजूर झाला आहे. मूलभूत सोयीसुविधा अंतर्गत हा निधी मिळाला आहे. त्यातून विविध विकासकामे केली जाणार आहेत.

केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदानाच्या संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी महापालिकेने 2010 सालात 22 कोटींचा प्रस्ताव तयार करून राज्य शासनाला सादर केला होता. 2013 सालात त्यापैकी 10 कोटींचा निधी (funding) मिळाला. 2015 सालात केशवराव भोसले नाट्यगृहाचे जतन, संवर्धन अंतर्गत सुशोभीकरण करण्यात आले. नाट्यगृहात अंतर्गत सजावट, लाईट इफेक्ट, साऊंड सिस्टीम, बैठक व्यवस्था, कंपाऊंड वॉलसह इतर अत्यावश्यक कामे करण्यात आली. मात्र, एकूण प्रस्तावापैकी निम्मा निधी मिळाल्याने उर्वरित कामे प्रलंबित राहिली. त्या कामासाठी महापालिकेने 30 ऑगस्ट 2018 रोजी उर्वरित निधी मिळावा म्हणून प्रस्ताव सादर केला होता. चालू डीएसआरनुसार हा प्रस्ताव 14 कोटींचा झाला आहे. मात्र, शासन पातळीवर त्याची तांत्रिक छाननी झाल्यानंतर 10 कोटींचा प्रस्ताव झाला. त्यानुसार निधी मिळावा, यासाठी महापालिकेने सातत्याने पाठपुरावा केला.

खासबाग मैदानावर होणार 56 लाखांचे लॉन

ऐतिहासिक राजर्षी शाहू खासबाग मैदानाची दुरवस्था झाली आहे. खासबागमध्ये प्रेक्षकांना बसण्यासाठी जागा असलेल्या लॉनची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे त्याठिकाणी नैसर्गिक लॉन तयार करण्यात येणार आहे. जुनी माती खोदाई करून त्याठिकाणी नवीन माती टाकणे आणि लॉन तयार करणे यासाठी महापालिकेने 56 लाख 84 हजार रु. कामाची निविदा काढली आहे. यातून खासबाग मैदानावर 6 हजार 700 चौरस मीटर लॉन तयार केले जाणार आहे. वर्षानंतर महापालिकेच्या वतीने मेंटेनन्ससाठी वार्षिक निविदा काढण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *