श्री दत्तचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील ‘डॉ. घाळी समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित

गडहिंग्लज/ प्रतिनिधी:

डॉ. घाळी प्रतिष्ठानचा समाजभूषण पुरस्कार (award) प्राप्त उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी जमीन क्षारपड मुक्तीसाठी यशस्वी केलेला ‘दत्त पॅटर्न’ देशाने स्वीकारावा आणि जमीन सुपीक करण्यासाठी देशपातळीवर नोंद घ्यावी यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. ज्यावेळी क्षारपड जमीन सुधारणा योजनेचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा गणपतराव पाटील यांचे नाव अग्रभागी कायम असेल, असे प्रतिपादन वारणा उद्योग समूहाचे चेअरमन तथा आम. डॉ. विनयरावजी कोरे यांनी केले.

गडहिंग्लज येथील विद्या प्रसारक मंडळ व डॉ. घाळी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार, कै. डॉ. एस. एस. घाळी साहेब यांच्या 36 व्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सहकार व कृषी क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांना ‘डॉ. घाळी समाजभूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आम. कोरे बोलत होते.

श्री दुरदुंडेश्वर सिद्धसंस्थान मठ निडसोशीचे पिठाधीश श्री. म. नि. प्र. जगद्गुरु पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या शुभहस्ते, आम. डॉ. विनयरावजी कोरे, वारणा बझारच्या अध्यक्षा सौ. शुभलक्ष्मी कोरे, शाहू उद्योग समुहाचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि विद्या प्रसारक मंडळ गडहिंग्लजचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी यांच्या अध्यक्षतेखाली समाजभूषण पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुरस्कारामध्ये मिळालेली रक्कम गणपतराव पाटील यांनी प्रतिष्ठानच्या कार्यासाठी डॉ. सतीश घाळी यांच्याकडे सुपूर्द केले.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आम. डॉ. विनयरावजी कोरे पुढे म्हणाले, समाजाभिमुख विचार करून, समाजाला दिशा देणारे आणि आपल्या कार्य कर्तृत्वातून लोकांचे दुःख कमी करणाऱ्या समाजातील लोकांना शोधून त्यांना पुरस्कार (award) देण्याचे डॉ. घाळी प्रतिष्टानचे कार्य उल्लेखनीय आहे. गणपतराव पाटील यांच्या अंगी प्रयोगशीलता असून अपयशाचा विचार न करता शेतकऱ्यांचे दुःख कमी करण्यासाठी ते जबाबदारी घेऊन काम करीत असतात. शेतकऱ्यांना संघटित करून जमिनीला पुनर्जन्म देण्याचे त्यांचे काम हे पुरस्कारापेक्षा मोठे आहे. उद्याच्या पिढीसाठी जमीन शाबूत ठेवण्याचे त्यांचे काम कौतुकास्पद आहे. समाज परिवर्तनाची ताकद असणारा पुरस्कार गणपतराव पाटील यांच्या रूपाने समाजासमोर आणण्याचे प्रतिष्ठानचे कार्यही उल्लेखनीय असून प्रतिष्ठानचे कार्य असेच पुढे सुरू राहू दे.

राजे समरजीतसिंह घाटगे म्हणाले, सहकार क्षेत्राला मार्गदर्शन आणि दिशा देण्याची गरज असताना पुरस्कारासाठी गणपतराव पाटील यांची योग्य निवड करण्यात आली आहे. सातत्याने नवनवीन तंत्रज्ञान, उसाला जास्त दर, विविध प्रयोग, चर्चासत्रे, मेळावे यांच्या माध्यमातून गणपतराव पाटील यांचे शेतकऱ्यांसाठी काम सुरू असते. ऊस विकास कार्यक्रमात दत्त कारखाना अग्रेसर आहेच. गणपतराव पाटील यांच्या कार्याकडे बघूनच कारखाना कसा चालवायचा असतो याचा आदर्श घेऊन आम्हीही काम करीत आहोत.

श्री दुरदुंडेश्वर सिद्धसंस्थान मठ निडसोशीचे पिठाधीश श्री. म. नि. प्र. जगद्गुरु पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामी यांनी गणपतराव पाटील यांच्या कार्याचा गौरव करून कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान वापरत बदल करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची त्यांची भूमिका मोलाची असल्याचे सांगितले. श्री जडयसिद्धेश्वर बसवकिरण महास्वामीजी यांनीही आशिर्वचन देऊन शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. सतीश घाळी यांनी घाळी प्रतिष्ठान आणि शिक्षण संस्थांच्या कामाचा आढावा घेतला. कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व या आघाड्यावर गणपतराव पाटील यांचे काम प्रेरणादायी आहे. समाजात बदल झाले पाहिजेत ही भूमिका घेऊन गणपतराव पाटील हे समाज विकासासाठी काम करीत आहेत. त्यांच्या सर्वांगीण कार्याचा आढावा घेऊनच त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला आहे.

सत्काराला उत्तर देताना गणपतराव पाटील म्हणाले, डॉ. एस. एस. घाळी यांच्या नावाने मिळालेला समाजभूषण पुरस्कार हा मला मिळाल्याचा आनंद असून माझी जबाबदारीही वाढली आहे. दत्त कारखान्याच्या माध्यमातून आठ हजार एकरावर क्षारपडमुक्तीचे काम झाल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आली आहे. कारखाना शेतकऱ्यांना माती, पाणी, पाने परीक्षण विनामोबदला करून देऊन सेंद्रिय कर्ब वाढविण्याबरोबरच दोनशे टनाचे ऊस उत्पादन शेतकऱ्यांनी घ्यावेत यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच आगामी काळात ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण तयार असल्याचीही ग्वाही त्यांनी दिली.

कै. डॉ. एस. एस. घाळी सांस्कृतिक सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन झाले. स्वागत गीत न्यू होरायझन सीबीएससी स्कुलच्या विद्यार्थिनींनी सादर केले. स्वागत व प्रास्ताविक सहसचिव प्रा. सीए. गजेंद्र बंदी यांनी करून प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेतला. मानपत्राचे वाचन प्रा. सुभाष कोरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. महेश कदम, प्रा. तेजस्विनी गारगोटे-खिचडी यांनी केले तर आभार ऍड. बी. जी. भोसकी यांनी मानले. पसायदान प्रा. तेजश्री कानकेकर यांनी सादर केले. सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विविध संस्था पदाधिकाऱ्यांनीही गणपतराव पाटील यांचा सत्कार केला.

यावेळी माजी आमदार श्रीपतराव शिंदे, माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी, भैय्यासाहेब कुपेकर, संग्राम कुपेकर, सुनील शिंत्रे, दिग्विजय कुऱ्हाडे, चंद्रकांत गुरव, डॉ. चेतन नरके, बसवराज आजरी, विद्याधर गुरबे, सोमगोंडा आरबोळे, मीनाताई कोल्हापुरे, किसनराव कुऱ्हाडे, गोकुळ संचालिका अंजना रेडेकर, शिवाजीराव पाटील, जी. बी. बारदेस्कर, नागेश चौगुले, मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, शंकरराव नंदनवाडे, रामाप्पा कडीगाळ, उदयराव जोशी, राजा शिरगुप्पी, रमेश रिंगणे, विद्याधर पाटील, महादेव साखरे, अरविंद कित्तुरकर, विद्या प्रसारक मंडळ व प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, सर्व संचालक, श्री दत्त कारखान्याचे व्हा. चेअरमन अरुणकुमार देसाई, सर्व संचालक, विविध संस्था, विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *