आवळी बुद्रुक येथे कोल्ह्याचा धुमाकूळ
आवळी बुद्रुक ता. राधानगरी येथे शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून रात्री दहा पर्यंत एका पिसाळलेल्या कोल्ह्याने धुमाकूळ घालून चार जणांचा चावा (bite) घेऊन जखमी केले. जखमीमध्ये एका तीन वर्षीय बालिकेचा समावेश असून तिला राधानगरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत आवळी बुद्रुकचे पोलीस पाटील नामदेव पोवार यांनी दिलेली माहिती अशी, शनिवारी सायंकाळी वीज उपकेंद्राजवळ संभाजी बाळू शिंदे (वय ७०) यांना जवळच्या शेतातून अचानक आलेल्या कोल्ह्याने चावा घेतला त्यांच्या पाठोपाठ बळवंत लहू पाटील (वय ६०) यांनाही कोल्ह्याने चावा घेऊन जखमी केले. शिंदे,पाटील यांनी आरडाओरडा केल्यानंतर कोल्हा तेथून पळून गेला.
दरम्यान, रात्री दहाच्या दरम्यान पुन्हा मुख्य रस्त्यावरील बाळासाहेब माने दूध संस्थेच्या परिसरात सुनील महिपती चौगले (वय ३८) यांचा चावा घेतला. तर दूध संस्थे शेजारील सरनाईक कुटुंबीयातील राजनंदिनी शिवराज सरनाईक या तीन वर्षाच्या बालिकेच्या मानेचा चावा (bite) घेतला. सरनाईक कुटुंबीयांनी आरडाओरडा केल्यानंतर कोल्हा शरदचंद्र विकास संस्थेच्या मागे असलेल्या उसात पळून गेला. गावातील तरुण काठ्या घेऊन कोल्ह्याच्या मागावर आहेत. पोलीस पाटील श्री.पोवार यांनी वनविभागाशी संपर्क साधून कोल्ह्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.