“जिल्हा प्रशासन व पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आमदारांना तरी विश्वासात घ्यावे”

सत्ताधार्‍यांकडून कोणत्याही विकासकामांसाठी आमदारांना विश्वासात घेतले जात नाही. श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडाही आमदारांना दाखविलेला नाही. वास्तविक आम्ही कोल्हापूरचे सुपुत्र. त्यामुळे आम्हाला समस्या समजणार. उणिवा असतील तर दाखवू, अन्यथा विकासकामांना सर्वतोपरी सहकार्य करू. मंदिर परिसराचा विकास झालाच पाहिजे. मात्र, जिल्हा प्रशासन व पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आमदारांना तरी विश्वासात घ्यावे. तर लोकशाही अबाधित राहील. कोल्हापूरच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन (political leader) आ. सतेज पाटील यांनी केले.

(political leader) आ. सतेज पाटील, आ. ऋतुराज पाटील व आ. जयश्री जाधव यांच्या प्रत्येकी 1 कोटी 5 लाख अशा एकूण 3 कोटी 15 लाख निधीतून केएमटीसाठी वातानुकूलीत 9 बसेस घेण्यात आल्या आहेत. त्याचे लोकार्पण माजी आ. मालोजीराजे व पाटील यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी शाहू स्मारक भवनात आयोजित कार्यक्रमात आ. पाटील बोलत होते.

मालोजीराजे म्हणाले, जुनेच कर असल्याने महापालिका आर्थिकद़ृष्ट्या सक्षम नाही. त्यामुळे सुविधा देताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. सतेज पाटील यांनी केएमटीला बसेस देण्याचा घेतलेला निर्णय स्तुत्य आहे. आ. ऋतुराज पाटील यांनी केएमटी अनेकांना आधार देण्याचे काम करत असल्याचे सांगितले. आ. जाधव यांनी सत्ताधारी विकासकामांत आडकाठी आणून दिशाभूल करत असल्याचे सांगितले.

यावेळी आर. के. पोवार, शारंगधर देशमुख, प्रतिज्ञा उत्तुरे, निलोफर आजरेकर, मधुकर रामाणे प्रमुख उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी स्वागत केले. विजय वणकुद्रे यांनी सूत्रसंचालन केले.

कोल्हापुरात रोज दोन लाख फ्लोटिंग पॉप्युलेशन

कोल्हापूर शहरात रोजचे फ्लोटिंग पॉप्युलेशन दोन लाखांवर असल्याचे सांगून आ. पाटील म्हणाले, रोज 50 हजार मोटारसायकली शहरात येतात. त्याचा वाहतुकीवर ताण पडतो. त्यामुळे शहरात भौतिक सुविधा देण्यासाठी प्रयत्न करू. थेट पाईपलाईन योजना अंतिम टप्प्यात आहे. लवकरच काळम्मावाडी धरणातून कोल्हापूरला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *