“भाजपाचा राज्याराज्यांत दंगली पेटवण्याचा हेतू”

(political news) राज्यभरात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आज गणरायाचं आगमन होत आहे. एकीकडे राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत असून दुसरीकडे दिल्लीत मात्र संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. देशातील राजकीय परिस्थितीवरून ठाकरे गटानं केंद्रातील भाजपा सरकारला लक्ष्य केलं असून राज्याराज्यांत दंगली पेटवण्याचा या सरकारचा हेतू असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटानं केला आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधक एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे.

“मिंधे राज्यकर्त्यांच्या फसव्या घोषणा हे…”

“एकीकडे दुष्काळ, नापिकी, त्यातून उद्भवलेला कर्जबाजारीपणा, त्यामुळे वाढलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि दुसरीकडे मिंधे राज्यकर्त्यांच्या फसव्या घोषणा हे राज्यावरील एक गंभीर संकटच आहे. दिल्लीश्वरांनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्राच्या माथी लादलेले हे संकट कायमचे दूर कर, अशीच प्रार्थना राज्यातील जनता आज श्रीचरणी करीत असेल”, अशा शब्दांत सामना अग्रलेखातून राज्यातील सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्यात आलं आहे.

“फक्त डंका व बोभाट्याचे फुगे”

“केंद्रातील ‘स्वयंघोषित’ राज्यकर्त्यांबाबतही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. महागाईपासून बेरोजगारीपर्यंत, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यापासून रोजगारनिर्मितीपर्यंत, धर्मापासून विकासापर्यंत, देशाच्या संरक्षणापासून तथाकथित आत्मनिर्भरतेपर्यंत फक्त डंका आणि बोभाट्याचे फुगे हवेत सोडले जात आहेत. राज्याराज्यांत जातीय, धार्मिक ध्रुवीकरणाचे उद्योग सुरू आहेत. त्यातून दंगली पेटवून त्यावर राजकीय स्वार्थाच्या पोळय़ा भाजण्याचे सत्तापक्षाचे इरादे आहेत”, असा आरोप ठाकरे गटानं केला आहे.(political news)

“इंडिया नव्हे, भारत’ची उचकी…”

“विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची वज्रमूठ २०२४मध्ये आपला सफाया करणार याची जाणीव झालेले राज्यकर्ते आणि त्यांचे भक्त यांना ‘इंडिया नव्हे भारत’ची उचकी लागली आहे. ‘चांद्रयान-३’ मोहिमेपासून ‘जी-२०’ परिषदेपर्यंत तथाकथित जागतिक यशाचा ‘क्लोरोफॉर्म’ जनतेला देण्याचे उद्योग होत आहेत. ‘हूल’ आणि ‘भूल’ ही सध्याच्या राज्यकर्त्यांची प्रमुख शस्त्र आहेत”, अशीही टीका ठाकरे गटानं केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *