कोल्हापूर : विसर्जनासाठी यंत्रणा सज्ज

कोल्हापूर शहरातील गौरी-गणपती विसर्जनासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. शहरात प्रमुख चौकात आणि वर्दळीच्या 180 ठिकाणी विसर्जन (Immersion) कुंड ठेवण्यात येणार आहेत. भाविकांना या कुंडात गणेशमूर्तींचे विसर्जन करता येणार आहे. त्यानंतर दान झालेल्या गणेशमूर्ती 152 टेम्पोतून नेऊन इराणी खणीत विसर्जित केल्या जाणार आहेत. त्यासाठी इराणी खणीवर स्वयंचलित यंत्र बसविण्यात आले आहे.
अग्निशमन जवानांसह सीसीटीव्ही…
महापालिका अग्निशमन दलाचे जवानही विसर्जनस्थळी सुरक्षिततेसाठी सर्व साधनसामग्रीसह तैनात असतील. विद्युत विभागाकडून विसर्जन ठिकाणी लाईटची व्यवस्था केली आहे. आरोग्य विभागाने विसर्जन ठिकाणांची साफसफाई करण्यासाठी आरोग्य निरीक्षकांच्या 12 टीम तयार केल्या आहेत. विर्सजनाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावले असून नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी प्रबोधनात्मक फलकही लावण्यात आले आहेत.
आरोग्य निरीक्षकांच्या 12 टीम…
पवडी विभागाकडून नागरिकांनी विसर्जन (Immersion) कुंडामध्ये विर्सजन केलेल्या गणेशमूर्ती एकत्र करून टेम्पोमधून वाहतूक करून इराणी खणीमध्ये विसर्जित करण्याची व्यवस्था केली आहे. तसेच विर्सजन स्थळाजवळील निर्माल्य गोळा करण्याचे काम करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने 12 आरोग्य निरीक्षकांच्या नियंत्राखाली त्या त्या प्रभागातील प्रत्येक विसर्जन कुंडाच्या ठिकाणी प्रत्येकी 2 प्रमाणे दोन शिफ्टमध्ये कर्मचारी नियुक्त केले आहेत.
प्रशासक के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्यासह इतर अधिकार्यांनी शहरातील विसर्जन यंत्रणेची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, उपआयुक्त साधना पाटील, शिल्पा दरेकर, सहायक आयुक्त संजय सरनाईक, डॉ. विजय पाटील, शहर अभियंता हर्षजीत घाटगे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
सर्वच प्रभागांत विसर्जन कुंड…
पंचगंगा नदी तसेच शहर परिसरातील तलावांचे प्रदूषण होऊ नये, म्हणून महापालिकेच्या वतीने सर्वच प्रभागांत विविध ठिकाणी 180 गणेश विसर्जन कुंड, निर्माल्य कुंड व मंडळांच्या वतीने काहिलींची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विसर्जन मार्गावरील खराब झालेल्या रस्त्यांचे पॅचवर्कचे कामही पूर्ण करण्यात आले आहे.
खत निर्मितीसाठी निर्माल्य…
आरोग्य विभागाच्या वतीने शहरामध्ये विविध ठिकाणी 1200 कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे. संकलित झालेले निर्माल्य खत तयार करण्यासाठी चार ठिकाणी व एकटी संस्थेस वाशी येथे खत तयार करण्यासाठी दिले जाणार आहे. या संस्थेच्या महिलांकडून निर्माल्याचे विलगीकरण करून खत निर्मितीचे काम करण्यात येणार आहे. यासाठी एकटी संस्थेच्या 150 महिला सदस्य हे काम करणार आहेत. शहरातील नागरिकांनी गणेशमूर्ती व निर्माल्याचे विसर्जन करून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.