राजू शेट्टींचं शेतकऱ्यांना आवाहन; सोन्याची कांडी…..

‘यंदा साखर कारखाने (Sugar Factory) ८० ते ९० दिवस चालतील. शेतकऱ्यांनी ऊस कारखान्यांना घालण्याची घाई करू नये. उसाची कांडी (Sugarcane Rate) ही सोन्याची कांडी आहे. ती भंगार भावात देऊ नका,’ असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केले. ते पन्हाळा तालुक्यातील सातवे येथे आयोजित आक्रोश पदयात्रेत बोलत होते.

शेट्टी म्हणाले, ‘गेले २५ ते ३० वर्षे आपण ऊसदराबाबत लढा उभा केला आहे. या लढ्याला चांगले यशही मिळत आहे. मात्र, प्रत्येक वेळी हे सर्व साखर कारखानदार साखर कारखाने कर्जातच आहेत असे सांगत आहेत. त्यामुळे उसाचे दर वाढले नाहीत. साखर निर्यातबंदी, साखर उद्योग धोक्यात आहे असे भासवले जात आहे.

मागचा हिशोब पूर्ण करत नाही तोपर्यंत उसाचे (Sugarcane Rate) कांडे तोडून देऊ नका यावर ठाम राहा. जेंव्हा बाजारपेठेत मागणीपेक्षा पुरवठा घटला, तेव्हा दर वाढतात पुरवठा वाढला की दर कमी होतात. त्यामुळे सोन्याची कांडी भंगार भावात देऊ नका, असंही त्यांनी आवाहन केलं.

यावेळी सातवे गावच्या वतीने आकाराम खामकर व बबन पानसकर यांच्या हस्ते राजू शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे पन्हाळा अध्यक्ष प्रणव निकम, विजय सावंत, दादा आंब्रे, अरविंद शेलार, सौरभ पाटील, पिंटू गोंधळी, शशिकांत शिंदे, भास्कर खामकर, तुलसीदास इंगवले, राहुल पाटोळे, बबन घोरपडे, व सातवे परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सातवे गावात राजू शेट्टींचे जोरदार स्वागत करण्यात आले. जागोजागी जेसीबीच्या साह्याने फुलांची उधळण करण्यात आले. तसेच ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. जयसिंगपूर येथे विक्रमसिंह मैदानावर ७ नोव्हेंबर रोजी ऊस परिषद होणार आहे. या ऊस परिषदेसाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *