..तर हसन मुश्रीफांना कोल्हापुरात येण्यास बंदी करण्यात येईल

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यात शासन कमी पडल्याने सकल मराठा समाजातर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात काल (गुरुवार) काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली. आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लागला नाहीतर पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना कोल्हापुरात येण्यास बंदी करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

राजकीय नेत्यांना गावबंदी करून साखळी उपोषणाद्वारे शासनाविरुद्ध रणशिंग फुंकण्याचा निर्धारही करण्यात आला. मनोज जरांगे-पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाचा प्रश्‍न चाळीस दिवसांत सोडविला जाईल, असे आश्‍वासन दिले होते.

त्याची पूर्तता न झाल्याने सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. ‘फसवे सरकार चले जाव,’ ‘या सरकारचे करायचे काय, खाली डोकं वर पाय,’ ‘एक मराठा लाख मराठा,’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. बाबा इंदुलकर, विजय देवणे, बाबा पार्टे यांनी सरकारविरोधात तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या. चंद्रकांत पाटील, महादेव पाटील, अवि दिंडे, श्रीकांत पाटील, सुनीता पाटील, पद्मावती पाटील, संभाजी जगदाळे, चंद्रकांत भोसले, अभिषेक देवणे, राजू जाधव, अभिजित काटकर निदर्शनात सहभागी झाले होते.

दरम्यान, कोल्हापूर जिल्हा सकल मराठा समाजाची शनिवारी (ता. २८) दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनमध्ये दुपारी चार वाजता बैठक आहे. मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा व मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाची ठोस भूमिका घेण्यात येईल. तरी समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वसंतराव मुळीक यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *