जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला!

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत पाडळी खुर्द (ता.करवीर) येथील ग्रामपंचायत, सकल मराठा समाज व सर्व ग्रामस्थांच्या वतीने आरक्षणासाठी लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला. तसेच सर्व निवडणुकांतील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय (decision) घेतला आहे. याबाबत आज फलक लावून या ठिकाणी घोषणा देण्यात आल्या.

यावेळी सरपंच तानाजी पालकर म्हणाले,‘ मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही आंदोलन पुकारले आहे.’ सुरेश पाटील म्हणाले, ‘ग्रामपंचायत व सर्व समाजाच्या वतीने, सर्व तरुण मंडळे, सर्व संस्था,सकल मराठा समाज यांच्यावतीने जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आज गावामध्ये लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्याचा निर्णय झाला.’

यावेळी तानाजी पाटील, दीपक पाटील ,विष्णुपंत पाटील, रोहन पालकर, अमित पाटील, विशाल सोनार, सुरज पाटील, ऋतुराज पाटील, मदन पाटील, विजय ढेंगे, तानाजी भाऊ पाटील ,संदीप पाटील, संग्राम भापकर, वसंत तोडकर उपस्थित होते.

शिरगाव येथेही लावणार फलक

शिरगाव: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांना जिल्ह्यासह राधानगरी तालुक्यातील गावागावातून पाठींबा मिळत आहे. शुक्रवारी खिंडी व्हरवडे,आमजाई व्हरवडे येथे मराठा आरक्षणासाठी पुढाऱ्यांना गावबंदीचे फलक लावण्यात आले आहेत. आता शिरगाव येथेही नेत्यांना गावबंदी करण्यासाठी शनिवारी गावच्या वेशीवर फलक लावण्यात येणार आहे. सकल मराठा समाज व ग्रामस्थांच्यावतीने हा निर्णय (decision) घेण्यात आला.

सेनापती कापशी: ‘एका रात्रीत सरकार बदलते, नोटबंदीसारखे निर्णय जनतेला कळण्याआधी होतात. मग चाळीस वर्षे मराठ्यांना न्याय का मिळत नाही. मराठ्यांनी असे काय घोडे मारले आहे?’ असा प्रश्न सकल मराठा समाजाचे आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते नामदेव भराडे यांनी केला. हळदवडे (ता. कागल) येथे मराठा आरक्षण प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत गावात सर्व पक्षाच्या लोकप्रतिनीधींना प्रवेश बंदीचा फलक लावताना ते बोलत होते.

यावेळी बाळासो भराडे, दगडू शेटके, दयानंद पाटील, अजिंक्य पोतदार आदींनी मनोगत व्यक्त केले. साताप्पा काशीद, प्रवीण भराडे, केरबा आसवले, आनंदा मोरे आदी उपस्थित होते. भागवत शेटके यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *