कुरूंदवाड पोलिसांच्या विशेष पथकाने केला रॅकेटचा पर्दाफाश

(crime news) कुरूंदवाड पोलिसांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत चार अट्टल चोरट्यांना जेरबंद करून त्यांच्याकडून पाच मोटारसायकलींसह अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शुभम संजय कोणे (वय 24), विशाल नरसिंग जाधव (25), अर्जुन महेश निवाते (22), चैतन्य ऊर्फ गणेश जेटाप्पा माळी (23, चौघे रा. जुना चंदूर रोड, इचलकरंजी) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

औरवाड (ता. शिरोळ) येथून इरफान शिराजुद्दीन करीम खान यांची बुलेट चोरीला गेली होती. यासह भागातील काही मोटारसायकली चोरीला गेल्याच्या तक्रारी होत्या. सपोनि रविराज फडणीस यांनी या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी गुप्त पथक तयार करून सापळा रचला होता. संशयित शुभम कोणे आणि अर्जुन निवाते हे दोघे चोरीच्या मोटारसायकलवरून जात असताना शिरढोण पुलाजवळ ते सापळ्यात अडकले.

दोघांना पोलिसी खाक्या दाखवताच चैतन्य माळी आणि विशाल जाधव यांची नावे निष्पन्न झाली. त्यांनी कुरूंदवाड, औरवाड आणि इचलकरंजी येथून दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी व्यक्त केली. कुरूंदवाड पोलिसांनी अशाप्रकारे यापूर्वी 3 रॅकेट उघडकीस आणली असून, ही चौथी मोठी कारवाई आहे. आतापर्यंत 12 हून अधिक अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. (crime news)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *