विद्यार्थ्यांना ‘प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती’ प्रक्रिया सुरू; अर्ज करण्याच्या तारखा…
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारमार्फत राष्ट्रीय शिष्यवृत्ती (scholarship) पोर्टलद्वारे नववी आणि दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना ‘प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती’ सुरु केली आहे. शिष्यवृत्तीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येतील.
सामान्य कुटुंबातील दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेता यावे, आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात खंड पडू नये या उद्देशाने केंद्र सरकारने नववी, दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना ‘प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती’ योजना सुरु केली आहे. राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलद्वारे (एनएसपी) ही योजना राबवण्यात येणार आहे.
‘एनएसपी’च्या सर्व योजनांसाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण बंधनकारक आहे. त्यामुळे ‘प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती’ योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करावे लागतील. अनुदानित शाळांनी शिष्यवृत्तीसाठी पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास मदत करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. विद्यार्थी स्वतंत्रपणेही अर्ज करू शकतील.
‘प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती’साठी (scholarship) अनुदानित शाळांतील विद्यार्थी अर्ज करू शकतील. विद्यार्थ्याचे दिव्यांगत्वाचे प्रमाण ४० टक्के किंवा त्याहून जास्त आवश्यक असून दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्यांकडून प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. पालकांच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा अडीच लाख आहे. पात्र दिव्यांगांना नऊ हजार ते १४ हजार ६०० रुपये शिष्यवृत्ती एका इयत्तेला एका शैक्षणिक वर्षासाठी एकदाच मिळेल.
चौकट
अर्ज करण्याच्या तारखा…
ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : ३० नोव्हेंबर
शाळास्तरावरील अर्ज पडताळणी : १५ डिसेंबर
जिल्हास्तरावर अर्ज पडताळणी : ३० डिसेंबर
माहितीसाठी अधिकृत वेबसाइट
१) www.scholarships.gov.in
२) www.depwd.gov.in
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ‘प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती’ सुरू करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. शिष्यवृत्तीमुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आर्थिक अडचणी दूर होतील.
– राजेश पाटील, माजी तालुकाध्यक्ष, भाजपा हातकणंगले