“स्वाभिमानीचे गनिमीकाव्याने आंदोलन सुरूच राहणार”

गत हंगामातील उसाला प्रतिटन 400 रुपये द्यावेत, वजन-काटे ऑनलाईन करावेत, आदी मागण्यांसाठी सुरू असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जनआक्रोश पदयात्रा स्थगित (adjourned) केल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथे सोमवारी जाहीर केले. स्वाभिमानीचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. मनोज जरांगे-पाटील उपोषणाला बसले आहेत. सर्वत्र मराठा समाजामध्ये अस्वस्थता आहे. सर्वत्र आंदोलने सुरू आहेत. त्यामुळे ही पदयात्रा स्थगित केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पोपट मोरे, संदीप राजोबा, महेश खराडे, भागवत जाधव, मराठा क्रांती मोर्चाचे दिग्विजय पाटील, उमेश कुरळपकर आदी उपस्थित होते.

राजू शेट्टी म्हणाले, गेल्या अडीच महिन्यांपासून उसाच्या दुसर्‍या हप्त्यासाठी आंदोलन सुरू आहे. कोल्हापूर येथील साखर आयुक्तालयावर मोर्चाही काढला होता. तसेच दोन आठवड्यांपासून जनआक्रोश पदयात्रेला सुरुवात केली होती. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा मनोज जरांगे-पाटील उपोषणाला बसले आहेत. 6 दिवस झाले तरी सरकार कोणताही निर्णय घ्यायला तयार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी स्वाभिमानीची भूमिका आहे. शेट्टी म्हणाले, मराठा समाजातील 85 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा शेतकर्‍यांची अवस्था बिकट झाली आहे. मी मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत सातत्याने मांडला आहे. आरक्षणासाठी केंद्राने पुढाकार घेतला पाहिजे. मात्र, राज्यालाही आपली जबाबदारी टाळता येणार नाही. मराठा आरक्षणासाठी जिवाभावाचा सहकारी जरांगे-पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे पदयात्रेत स्वागत, हार, तुरे स्वीकारणे माझ्या विवेकबुद्धीला पटत नाही. त्यामुळे करमाळे (ता. शिराळा) येथे पदयात्रा स्थगित (adjourned) करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मराठा क्रांती मोर्चाही ऊस आंदोलनात उतरणार…

राजू शेट्टी यांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आभार मानले. आता, ऊस दर आंदोलनात मराठा क्रांती मोर्चा स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबर उतरणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी जाहीर केले.

उसाचे एक कांडेही कारखान्याला जाऊ देणार नाही…

राजू शेट्टी म्हणाले, जनआक्रोश यात्रा 522 कि.मी. जाणार आहे. स्थगितीने अजून 222 कि.मी.चा प्रवास राहिला आहे. मात्र, स्वाभिमानीचे गनिमीकाव्याने आंदोलन सुरूच राहणार आहे. गतवर्षीच्या उसाला 400 रुपये दिल्याशिवाय कारखान्यांना एक कांडेही जाऊ देणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *