कोल्हापूर : कर्नाटकात जाणार्‍या कार्यकर्त्यांना रोखले

मराठी भाषिकांच्या वतीने बेळगाव येथे साजरा होणार्‍या काळ्या दिनाच्या (black day) कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी जात असताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकारी, व कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडविले. पुणे-बेंगलोर महामार्गावर कागल येथील दूधगंगा नदीजवळ महाराष्ट्र पोलिसांनी बुधवारी ही कारवाई केली. यावेळी देवणे यांनी महामार्गावरच ठिय्या आंदोलन केले, त्यामुळे दोन तास महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

कर्नाटकमध्ये बेळगाव येथे असणार्‍या मराठी भाषिकांच्या वतीने 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन (black day) साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी जात असलेल्या देवणे आणि इतर पदाधिकारी यांना रोखल्याने पोलिसांशी त्यांची झटापट झाली. त्यानंतर महामार्गावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे दोन तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली. यावेळी मराठी भाषिक जनतेला वेठीस धरणार्‍या कर्नाटक शासनाचा धिक्कार असो, बेळगाव आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कर्नाटक शासन यांचाही निषेध करण्यात आला. सीमेवर कर्नाटक पोलिसांचाही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

यावेळी विजय देवणे म्हणाले, बेळगावला जाण्यासाठी सीमेवर जरी अडवले तरी गनिमी काव्याने आपण बेळगावला जाणारच आहे. कर्नाटक शासनाला महाराष्ट्राचे पोलिस मदत करीत आहेत. अशावेळी समन्वय समितीच्या मंत्र्यांनी सीमेवर यायला हवे होते. कर्नाटक शासन मराठी भाषिकांचा आवाज दडपत आहे. भाजप प्रणित कन्नड वेदिकाला परवानगी दिली जाते तर मराठी भाषिकांना परवानगी नाकारली जाते, मराठी भाषिकांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बेगडी प्रेम आहे.

यावेळी जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, शिवगोंडा पाटील, विद्या गिरी, विशाल देवकुळे, विनोद खोत, विराज पाटील, वैभव आडके, सागर पाटील आदी सहभागी होते. कागल पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली आणि त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पोलिस स्टेशनमध्ये आणल्यानंतर त्यांना सोडून दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *