करंजी बनवण्यासाठी सारणाचे तीन प्रकार

दिवाळीच्या फराळातील अनेकांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे करंजी. अतिशय पारंपरिक असलेला हा पदार्थ घरोघरी बनवला जातो. करंजीला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी खूप महत्त्व असते. त्यामुळे अनेक जण फराळ बनवण्याची सुरुवातच करंजीपासून करतात. पण, चांगल्या खुसखुशीत, रुचकर व चविष्ट करंज्या बनवताना आपण दरवर्षी एकाच प्रकारचे सारण वापरतो. पण, आज आम्ही तुम्हाला सारणाचे चार वेगवेगळे प्रकार सांगणार आहोत. चारही प्रकारच्या सारणाचा वापर करून तुम्ही चविष्ट, खमंग अन् खुसखुशीत करंजी बनवू शकता. पण, या चार सारणांपैकी दोन सारणांच्या प्रकारात साखर; तर दोन प्रकारांत गुळाचा वापर करायचा आहे.

करंजीच्या सारणाचे चार वेगवेगळे प्रकार
१) सुके खोबरे आणि साखरेचे सारण :
सुके खोबरे- १ कप
पिठीसाखर – २.५ कप
खसखस- २ ते ३ टीस्पून
सुक्या मेव्याचे काप
साजूक तूप- २ टीस्पून
वेलची पावडर (Cardamom powder) – १/४ टीस्पून

कृती
सुके खोबरे, खसखस फिकट सोनेरे रंग येईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर कढईत तूप टाकून, सुक्या मेव्याचे काप तळून घ्या. सुक्या मेव्याचे काप तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आता खसखस मिक्सरमधून थोडे जाडसर वाटून घ्या. नंतर एका प्लेटमध्ये सुके खोबरे, खसखस पावडर, सुक्या मेव्याचे काप, वेलची पावडर (Cardamom powder) एकत्र करा आणि त्यात पिठीसाखर टाकून मिश्रण (सर्व पदार्थ एकत्र करताना ते आधी थंड करून मगच टाका) एकजीव करा.

२) गुळाचे सारण
पांढरे तीळ- २०० ग्रॅम / १ कप
बारीक चिरलेला गूळ- २०० ग्रॅम / १ कप
सुके खोबरे- १०० ग्रॅम / १ कप
खसखस- २ ते ३ टीस्पून
वेलची पावडर- १/४ टीस्पून

कृती
सर्वप्रथम गरम कढईत तीळ खरपूस भाजून घ्या. त्याच प्रकारे खसखस व सुके खोबरेही भाजून घ्या. आता भाजून थंड केलेले तीळ, खसखस मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. आता त्यात बारीक चिरलेला गूळ, वेलची पावडर, भाजलेले खोबरे टाकून मिक्सरमध्ये पुन्हा वाटून घ्या.

३) गव्हाच्या पिठाचे आणि रव्याचे सारण
गव्हाचे पीठ- १/२ कप
बारीक रवा- १/२ कप
सुके खोबरे- १ कप
खसखस- २ ते ३ टीस्पून
पिठीसाखर- २.५ कप
सुक्या मेव्याचे काप
साजूक तूप- २ ते ३ टीस्पून
वेलची पावडर- १/४ टीस्पून

कृती
करंजीच्या प्रत्येक सारणात खसखस, खोबरे वापरले जाते. आता या प्रकारातही तुम्ही आधी खसखस, खोबरे वेगवेगळे भाजून घ्या. त्यानंतर त्याच कढईत साजूक तूप टाकून, रवा सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. आता पुन्हा कढईत तूप टाकून, गव्हाचे पीठ सोने रंग येईपर्यंत भाजून घ्या. आता मिक्सरच्या भांड्यात खसखस जाडसर बारीक करून घ्या. आता हाताने चुरलेले व भाजलेले सुके खोबरे, रवा, गव्हाचे पीठ, सुका मेवा, पिठीसाखर, वेलची पावडर टाका. आता या मिश्रणात तयार झालेल्या गुठळ्या नीट फोडा. अशा प्रकारे तुमचे सारण तयार झाले आहे.

४) चण्याच्या पिठाचे सारण
चणे हरभरे- १ किलो (७५० ग्रॅम डाळ मिळते.)
गूळ- ७५० ग्रॅम
सुके खोबरे- अर्धा किलो
काळे तीळ- पाव वाटी (पांढरे तीळही वापरू शकता)
वेलची पूड- ४ टीस्पून
जायफळ पूड – १ टीस्पून
मीठ- अर्धा टीस्पून
सुंठ पावडर- २ टेबलस्पून

कृती
चण्याचे पीठ चांगल्या प्रकारे भाजून, ते किसलेल्या गुळात चांगल्या प्रकारे मिसळा. त्यानंतर हे मिश्रण चांगल्या प्रकारे एकजीव होण्यासाठी मिक्सरमधून वाटून घ्या. त्यात सुके खोबरे, काळे तीळ, जायफळ पूड, वेलची पूड, मीठ, सुंठ पावडर टाकून हे मिश्रण हवाबंद डब्यात ठेवू शकता. त्यात तूप गरम करून टाकल्यास, त्याचे तुम्ही लाडूही बनवू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *