जिल्ह्यात पहिल्याच दिवशी आढळल्या कुणबीच्या नोंदी
जिल्ह्यात कुणबी नोंदी शोधमोहीम (expedition) मंगळवारपासून सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी जिल्ह्यात पाचशेहून अधिक कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. या शोधमोहिमेचे चोख नियोजन करा, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिल्या.
कुणबी नोंदी शोधण्यासाठी संपूर्ण राज्यभर मोहीम (expedition) राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातही स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्ह्यात विविध विभागांकडून आजपासून शोध मोहीम सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यात उपलब्ध अभिलेख्यांची (रेकॉर्ड) एकूण पाने निश्चित केली जाणार असून, त्यानूसार प्रत्येक कार्यालयात कर्मचार्यांचे नियोजन केले जाणार आहे.
तहसील कार्यालयात आजपासूनच नोंदी शोधण्यास सुरुवात झाली. जिल्ह्यात पहिल्याच दिवशी पाचशेहून अधिक कुणबीच्या नोंदी आढळून आल्या. करवीर तालुक्यातील एकट्या आमशी गावात 100 हून अधिक नोंदी गाव नमुन्यात आढळून आल्या आहेत. कारागृहातही 1957 सालची एका कैद्याची कुणबी जातीची नोंद आढळून आली आहे.
चोख नियोजन करा : तेली
अकुणबी नोंदी शोधण्यासाठी चोख नियोजन करा, त्याचबरोबरच तपासलेल्या अभिलेख्यांच्या नोंदी बाबतची माहिती जिल्हा प्रशासनाला दररोज सादर करा, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी बैठकीत केल्या. ते म्हणाले, नोंदी तपासण्याचे काम गतीने मार्गी लावण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नियुक्त करा. कुणबी नोंदीच्या अभिलेख्यांचे तसेच मोडी, उर्दू लिपीतील अभिलेख्यांचे भाषांतर व डिजिटायजेशन करा. तपासणीची माहिती विहित नमुन्यात भरून द्या, अशीही सूचना त्यांनी विविध विभागांना केली. यावेळी पुराभिलेखागार विभागाच्या सहायक संचालक दीपाली पाटील, तहसीलदार जयवंत पाटील तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.