सांगलीत तरुण ठार; नातेवाईकांनी ‘सिव्हिल’मध्ये घातला गोंधळ
(crime news) भरधाव कारने जोराची धडक दिल्याने शेगाव (ता. जत) येथील ऋषिकेश पोपट सावंत (वय 23) हा तरुण ठार झाला. हळद भवनसमोर सोमवारी रात्री हा अपघात झाला. दरम्यान, ऋषिकेशचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी ‘सिव्हिल’मध्ये गोंधळ घातला.
ऋषिकेश सध्या तो आईसोबत सांगलीत टिंबर एरियात राहत होता. त्याने आयटीआयचे शिक्षण घेतले आहे. तो कुपवाड एमआयडीसीत एका कंपनीत नोकरी करून बीकॉमचे शिक्षण घेत होता. सोमवारी दुपारी चार वाजता तो कंपनीत नोकरीवर गेला होता. काम आटोपल्यानंतर तो दुचाकीवरून घरी येत होता. हळद भवनसमोर आल्यानंतर त्याला समोरून कारने जोराची धडक दिली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता.
सांगलीच्या शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टरांनी मंगळवारी सकाळी त्याला डिसचार्ज दिला. घरी नेल्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. ऋषिकेशच्या मृतदेहाची मिरज शासकीय रुग्णालयात ‘इन कॅमेरा’ विच्छेदन तपासणी करण्यात आली. कारचे टायर फुटल्याचे हा अपघात झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. (crime news)