सीपीआरसाठी भरघोस निधी मंजूर

छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात अर्थात सीपीआरसाठी राज्य शासनाने 28 कोटी 80 लाख रुपयांचा निधी (funding) मंजूर केला. यातून अत्याधुनिक निर्जंतुकीकरण यंत्रणा आणि ऑपरेशन थिएटर्सचे काम केले जाणार आहे. याबाबतचे आदेश राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने शुक्रवारी काढले.

सीपीआरमध्ये दररोज सरासरी 1,500 रुग्णांवर बाह्य विभागात उपचार होतात. रुग्णालयात दररोज सरासरी 800 ते 900 दाखल रुग्णांवर उपचार सुरू असतात. मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या असल्याने जंतुसंसर्गाचा धोका अधिक आहे. हा धोका कमी व्हावा, रुग्णालयाच्या प्रत्येक विभागाचे वेळेवर आणि योग्य पद्धतीने निर्जंतुकीकरण व्हावे, याकरिता अत्याधुनिक निर्जंतुकीकरण यंत्रणा रुग्णालयात बसविण्यात येणार आहे.

या यंत्रणेकरिता राज्य अनुदान योजनेतून 14 कोटी 90 लाख रुपयांचा निधी (funding) मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून रुग्णालयात ही यंत्रणा बसवली जाणार आहे. याकरिता आवश्यक फर्निचर, साहित्य, उपकरणे खरेदी करून ती बसवणे आणि प्रत्यक्ष कार्यान्वित करण्याकरिता ‘सेंटर स्टिराईल सप्लाय डिपार्टमेंट’साठी हा निधी देण्यात आला आहे. राज्यातील महत्त्वाच्या खासगी रुग्णालयांत अशी व्यवस्था आहे, ती आता यानिमित्ताने सीपीआरमध्येही उपलब्ध होणार आहे. निर्जंतुकीकरणासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात येणार असल्याने दाखल रुग्णांत वाढणारा संसर्ग कमी होण्यास मदत होणार आहे.

राज्य अनुदान योजनेतून निधी

सीपीआरमध्ये विविध विभागांची 13 लहान-मोठी ऑपरेशन थिएटर आहेत. यामध्ये दररोज 200 ते 250 लहान-मोठ्या शस्त्रक्रिया होत असतात. यामुळे सध्या असलेल्या ऑपरेशन थिएटर्सपैकी सात ठिकाणी मॉड्युलर ऑपरेशन थिएटरसाठी 13 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधीही राज्य अनुदान योजेनेतून देण्यात आला आहे. यामुळे सीपीआरमधील ऑपरेशन थिएटरही आणखी अत्याधुनिक होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *