‘रॉकी और रानी..’च्या ‘रंधावा पॅराडाइज’मध्ये हत्येनं खळबळ

(entertenment news) निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने बऱ्याच वर्षांनंतर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पुनरागमन केलं. या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. प्रेक्षक-समीक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. दमदार कथा, कलाकार, भव्यदिव्य सेट यांसोबतच चित्रपटातील एका गोष्टीने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं, ते म्हणजे ‘रंधावा पॅरडाइज’. चित्रपटात करोल बागमध्ये दाखवण्यात आलेलं महालासारखं हे घर खऱ्या आयुष्यात ग्रेटर नोएडा परिसरात आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर हा फार्महाऊस पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण या ठिकाणी एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे.

‘रंधावा मॅन्शन’मध्ये मर्डर

ग्रेटर नोएडा पश्चिम, उत्तरप्रदेशमध्ये स्थित गौर मलबरी फार्महाऊसमध्ये ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचं शूटिंग पार पडलं होतं. या चित्रपटात रणवीर सिंहने रॉकी रंधावाची भूमिका साकारली होती. रॉकी रंधावा त्याच्या कुटुंबीयांसोबत या फार्महाऊसमध्ये राहत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हा फार्महाऊस फार चर्चेत आला होता. आता एका मर्डर केसमुळे या जागेनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. फार्महाऊसच्या आत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री एका लग्नसमारंभादरम्यान 55 वर्षीय अशोक यादव यांच्यावर त्यांच्या मुलाच्या सासऱ्याने गोळी झाडली. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.

55 वर्षीय अशोक यांची हत्या

सेंट्रल नोएडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडा पश्चिममधल्या गौर मलबरी फार्महाऊसमध्ये लग्नसमारंभ पार पडला. याच ठिकाणी गाजियाबादचा राहणारा शेखर या व्यक्तीने सोमवारी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास अशोक यांच्यावर गोळी झाडली. अशोक यांचा मुलगा आणि शेखर यांची मुलगी यांच्या वैवाहिक आयुष्यात समस्या सुरू होत्या. घटस्फोटामुळे या दोन्ही कुटुंबीयांमध्ये वाद सुरू होते. (entertenment news)

फार्महाऊसमध्ये शूटिंग

या फार्महाऊसला ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात ‘रंधावा पॅराडाइज’ म्हणून दाखवण्यात आलं होतं. चित्रपटाच्या मुख्य शूटिंग लोकेशन्सपैकी हे एक होतं. चित्रपटातील काही भव्य महालाचे सीन्स याच ठिकाणी शूट करण्यात आले होते. या चित्रपटामुळेच हा महाल विशेष चर्चेत आला होता. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटात आलिया आणि रणवीरसोबतच जया बच्चन, शबाना आझमी आणि धर्मेंद्र यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *