शिरोळ येथे आम्ही सारे लोककला महोत्सवाची सांगता; लोककलेतून महाराष्ट्राची परंपरा, संस्कृतीचे दर्शन

शिरोळ / प्रतिनिधी :

(local news) लोककलाकारांची भाकरी जपण्याचे कार्य लोककला महोत्सवातून होत असते. हे कार्य खरोखरच ऐतिहासिक आहे. निर्मळ आरोग्य राखण्यासाठी माणसाला लोककला आवश्यक आहेत. समाज सध्या आजारी पडला असून त्याला दुरुस्त करण्यासाठी लोककलांना पुनर्जीवित केले पाहिजे. त्यासाठी लोककलेला तुच्छ लेखणे आपण बंद झाले पाहिजे. अशा बदलत्या प्रवाहात लोककला शिक्षण केंद्र निर्माण होण्याची गरज असून त्यासाठी दत्त कारखाना चेअरमन गणपतराव पाटील यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांनी केले.

येथील माजी आमदार स्वर्गीय डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित लोककला महोत्सवात विविध कलाकारांनी कलाविष्कार सादर केले. त्यानंतर आम्ही सारे लोककला महोत्सव सांगता प्रसंगी कलाकारांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. यावेळी लोककला महोत्सवात सहभागी कलाकारांना सन्मानपत्र सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी समाजवादी प्रबोधिनीचे प्रसाद कुलकर्णी म्हणाले, महाराष्ट्राला लोकसाहित्य, संस्कृतीची शेकडो वर्षाची परंपरा आहे. लोककलेतून सादर झालेले भारुड, गोंधळ, ओव्या, भौतिक अंग हे महाराष्ट्राचे संचित आहे . ग्रामीण संस्कृतीचे दर्शन देणारा हा लोककला महोत्सव नवी विचारधारा देत असून या लोककला महोत्सवाच्या माध्यमातून चिंतन, मनन करून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे सर्वांनी वाहक बनावे, असे सांगून त्यांनी माजी आमदार स्व. सा. रे. पाटील सोशल फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात गणपतराव पाटील यांनी लोककला आणि लोक कलाकारांना शासन दरबारी न्याय देण्यासाठी फौंडेशन पुढाकार घेईल असे आश्वासन देऊन शुभेच्छा दिल्या.

या महोत्सवात हरोली येथील हलसिद्धनाथ ओविकार मंडळ, धरणगुत्ती येथील लक्ष्मी बिरदेव ओविकार संघ, बिरदेव लक्ष्मी ओविकार मंडळ- अब्दुललाट आणि बिरदेव ओविकार मंडळ (शिरोळ ) यांनी धनगरी ओव्या सादर केल्या. हेरवाड येथील संतुबाई ओविकार मंडळाच्या महिलांनीही धनगरी ओव्या सादर केल्या. बहुतांशी कला संघानी ओव्यांमध्ये स्व. आम. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या कर्तृत्वाची महती गायली. त्याचबरोबर हलगी वादनामध्ये राजू आवळे हलगी वादन समूह ( कुरुंदवाड ), उत्तम बिरणगे- (टाकळी ) यांनी हलगी वादन केले. तर महादेव रामू कोष्टी- खिद्रापूर यांच्या संघाने करंढोल या दुर्मिळ वाद्याचे शास्त्रीय वादन केले. स्वर म्युझिक ग्रुप कुरुंदवाड यांनी अनेक तालवाद्यांची जुगलबंदी सादर केली. शिरोळच्या अनिरुद्ध मारुती कोळी आणि जयसिंगपूरच्या अशोक कृष्णा गोंधळी यांनी पारंपरिक गोंधळ सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. आनंदा कुंभार (शेडशाळ ) यांचे तबला वादन व मोहन योसेफ चांदणे- पन्हाळकर यांचे सॅक्सोफोन वादनाने रसिकांची मने जिंकली. माऊली महिला भजनी मंडळ यांचे भारुड तर बाळ महाराज यांनी संतपदी सादर केली. कन्या विद्यामंदिर दत्तनगर- जोगवा नृत्य, आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील उदगाव टेक्निकल हायस्कूलच्या मुलीनी शेतकरी गीत सादर केले.

शिरोळच्या आसावरी हेर्लेकर आणि धडाका ग्रुप उदगावच्या विना गायकवाड, मोहिनी खोत यांनी लावणी नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. सारेगम फेम दिव्या मगदूम हिने आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. भीम संघर्ष गायन पार्टी (टाकवडे) यांनी भीम गीते सादर केली. रफिक पटेल व बाबासाहेब नदाफ यांनी शाहिरी छक्कड सादर करून महोत्सवामध्ये जाण आणली. कलाकारांनी सादर केलेल्या प्रत्येक कलेला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसादाबरोबरच कलाकारांना प्रोत्साहनपर बक्षिसे दिली. या महोत्सवास व्याख्याते वसंत हंकारे,

शिरोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शशिकांत प्रचंडराव, दत्त कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, श्रीनिवास कुंभार, हसन देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (local news)

सदर महोत्सव यशस्वी करण्यासाठी फौंडेशनचे सचिव शेखर पाटील, उद्योगपती अशोकराव कोळेकर, मुसा डांगे, राजेंद्र प्रधान , डॉ. दगडू माने, प्रदीप ऊर्फ बाळासाहेब बनगे, अरुण पाटील, बाळासाहेब गावडे , चंद्रशेखर कलगी, संजय सुतार, जगन्नाथ कांबळे, किरण पाटील, तानाजी गावडे, किरण पाटील – कणंगलेकर, शक्तीजीत गुरव यांच्यासह कारखाना व विविध संस्थांचे संचालक, पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

शिरोळ येथे माजी आमदार स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील सोशल फाउंडेशनच्या वतीने झालेल्या निमंत्रित लोककला महोत्सवात सुमारे 250 कलाकारांनी सहभाग नोंदविला. सहभागी कलासंघाना चहा, नाष्टा , भोजन यासह प्रवास खर्चासाठी रक्कम देण्यात आली. उत्कृष्ट, शिस्तबद्ध नियोजनात झालेल्या या महोत्सवाची चर्चा रंगली असून सादर झालेल्या सांस्कृतिक कलाविष्कार कार्यक्रमातील कलाकारांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *