मोठी बातमी! शाहू महाराज लोकसभा निवडणूक लढवणार?

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून (Kolhapur Loksabha Constituency) सर्वमान्य उमेदवार (candidate) म्हणून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता वाढली आहे. राजर्षी शाहू महाराजांचे वारस, पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते, राजघराण्याचे वलय या शाहू महाराज यांच्या दृष्टीने जमेच्या बाजू आहेत. त्यातून ही जागा काँग्रेसला घेऊन त्यांनाच उमेदवारी मिळेल, असे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार (Sharad Pawar) हे आज व उद्या पुण्यात आहेत. त्यानंतर सोमवारी (ता. १२) त्यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व काँग्रेस नेत्यांची संयुक्त बैठक मुंबईत होणार असून त्यात जागा वाटपांसह काही मतदारसंघांतील उमेदवारांची नावेही निश्‍चित होणार आहेत.

आज याच पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी माजी मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. गेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही जागांवर त्यावेळच्या ठाकरे गटाचे खासदार निवडून आले. पण, त्यांनी नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला.

त्यामुळे दोन्ही जागांवर शिवसेनेकडून दावा सांगितला जात असला तरी या घडीला त्यांच्याकडे प्रबळ उमेदवार (candidate) नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील सोडल्यास कोण इच्छुक नाही. काँग्रेसचे या मतदारसंघात विधानसभेचे तीन व विधानपरिषदेचे दोन आमदार असल्याने त्यांची बाजू भक्कम आहे. पण, काँग्रेसकडूनही बाजीराव खाडे वगळता कोणीही इच्छुक नाही.

या पार्श्‍वभूमीवर सर्वमान्य उमेदवार म्हणून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचे नाव पुढे आले आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनीही ‘सरप्राईज’ चेहरा उमेदवार असेल असे सांगत अप्रत्यक्षरित्या या नावालाच सहमती दिल्याचे समजते. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांचे आंदोलन मागे घेण्यासाठी घेतलेला पुढाकार, जरांगे यांच्या कोल्हापुरातील सभेतील उपस्थिती पाहता शाहू महाराज यांचीही निवडणूक लढण्याची तयारी दिसून येत आहे. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज उमेदवार असतील तर त्यांच्या नावाला ‘महाविकास’ मधूनही कोणी विरोध करण्याची शक्यता नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *