केंद्रीय अधिकारी असल्याचे भासवून उद्योजकाची कोटींची फसवणूक

(crime news) गोवा येथील केंद्रीय भांडारचा प्रभारी अधिकारी आहे, असे भासवून व बनावट कागदपत्रे बनवून यड्राव येथील उद्योजकाची एक कोटी 25 लाख 77 हजार 347 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शहापूर पोलिसात दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. श्रीमती वैशाली मांजरेकर (पत्ता समजू शकला नाही) आणि धवल शहा (रा. बोहरापट्टी, नाशिक) अशी संशयितांची नावे अहेत. याबाबतची फिर्याद संतोष जनगोंडा पाटील (रा. ईस्ट मँचेस्टर होम्स यड्राव) यांनी दिली आहे.

संतोष पाटील यांची पार्वती औद्योगिक वसाहत यड्राव येथे इचलकरंजी टेक्स्टाईल्स प्रा.लि. या नावाची फर्म आहे. या कारखान्यातून कापड बनवून विक्री करण्याचा ते व्यवसाय करतात. जानेवारी 2023 पासून वैशाली मांजरेकर यांनी त्या केंद्रीय भांडार गोवाच्या प्रभारी अधिकारी आहेत, असे पाटील यांना भासवून त्यांनी त्यांच्या कंपनीस स्टेशनरी साहित्य पुरवण्याची वर्कऑर्डर देण्याचा अधिकार नसतानाही 17 फेब—ुवारी 2019 रोजी वर्कऑर्डर दिली.

या वर्कऑर्डरप्रमाणे मांजरेकर यांनी स्टेशनरी साहित्य वृषभदेव व्हेंचर्सचे धवल शहा यांच्याकडून घेण्याची अट घालून धवल शहा यांच्याशी संगनमत करून केंद्रीय भांडार गोवा यांच्या लेटरहेडवर प्रभारी अधिकारी म्हणून स्वाक्षर्‍या केल्या. तसेच केंद्रीय भांडार गोवा येथील कार्यालयाचा गैरवापर करून व बनावट कागदपत्रे बनवून त्यावर स्वाक्षर्‍या करुन पाटील यांच्या कंपनीचा विश्वासघात केला. पाटील यांनी संशयीतांसोबत केलेल्या व्यवहाराची 1 कोटी 20 लाख इतकी रक्कम तसेच जीएसटीमधील फरक 5 लाख 77 हजार 347 असे एकूण 1 कोटी 25 लाख 77 हजार 347 इतकी रक्कम पाटील यांना आजपर्यंत परत न करता त्यांची फसवणूक संशयीतांनी केली. तसेच तुमच्यामुळे मी निलंबीत झाले आहे, मी बघून घेते अशी धमकी संशयीतांनी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. (crime news)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *